एक, दोन नव्हे तर तब्बल ३४ विनोदवीरांनी (स्टॅण्डअप कॉमेडियन) एकत्र येऊन आपल्या आवाजात राष्ट्रगीत गाऊन यंदाचा स्वातंत्र दिन साजरा करून एका दृष्टीने राष्ट्राला वंदन केले आहे. रंगमंचावर विविध मिमिक्री सादर करून खळखळून हसविणाऱ्या या सर्वच विनोदवीरांना एकत्र आणण्याची जबाबदारी ‘पैचान कौन’ फेम विनोदवीर नवीन प्रभाकर याने लीलया पेलली. समाजासमोर आपली कला सादर करताना देश आणि देशासाठी आपले असणारे योगदान हे महत्त्वाचे असते. आपल्यासमोर असणारे आदर्श हेच खरे आपले आधारस्तंभ असतात. याच भावनेतून सर्व देशभरातील सर्व विनोदवीरांना एकत्र आणून त्यांच्या आवाजात राष्ट्रगीत गाण्यासाठी नवीनने ठरविले आणि त्याला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला. या राष्ट्रगीताच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नवीनने स्वत: उचलली. या राष्ट्रगीतामध्ये जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, दिनेश हिंगो, राजू श्रीवास्तव, सुनील पाल, सुदेश लाहिरी, मेघना एरंडे, भारती सिंग, माधव मोघे, गंगुबाईफेम सलोनी असे तब्बल ३४ मराठी आणि अमराठी विनोदवीर सहभागी झाले. राष्ट्रगीत हे फक्त ५२ सेकंदाचेच असले पाहिजे, असा शासनाचा नियम आहे. याची जाणीव ठेवत तब्बल ३४ विनोदवीरांना त्यांच्या आवाजात गाण्याचे दिग्दर्शन करणे तसे आव्हानात्मक काम होते. अर्थात हे सर्व कवळ ५२ सेकंदात बसवायचे होते, असे सांगून नवीन म्हणाला की प्रत्येक सेकंदाचा वापर अत्यंत मेहनतीने करून हे राष्ट्रगीत वेळेत पूर्ण करण्यात आले. निर्माते संजय महाले यांचे सहकार्य लाभल्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे नवीनने सांगितले. बॉलीवूडचा आघाडीचा संगीतकार योगेश प्रधान याने या राष्ट्रगीताला संगीत दिले आहे. येत्या १५ ऑगस्टला हे राष्ट्रगीत सर्वत्र दाखविण्याचा नवीनचा प्रयत्न आहे.