गणेशोत्सव म्हटला की सगळीकडे आनंदाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. अनेक मुस्लीम सेलिब्रिटी देखील गणरायाची भक्तीभावाने पूजा करतात. मात्र त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील केली जाते. असाच काहीसा प्रकार अभिनेता आमिर अलीसोबत घडला आहे. मुस्लीम असुनही गणपती बाप्पाची पूजा का करतोस? असा प्रश्न विचारत काही टीकाकारांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. या ट्रोलर्सला त्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाला आमिर अली?
आमिर अली एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र काही नेटकऱ्यांना हे आवडलं नाही. एक मुस्लीम असूनही गणेशोत्सव कसा काय साजरा करतोस? असा सवाल विचारत त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्रोलर्सला आमिरने चांगलंच सुनावलं आहे. “होय मी एक मुस्लीम आहे, पण मला इतर धर्मांबाबतही तेवढाच आदर आहे. मी अल्लाहवर विश्वास ठेवतो. माझे काही मित्र इतर धर्मांवर विश्वास ठेवतात. पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही. कारण सर्व धर्म शांती आणि प्रेमाचाच संदेश देतात.” अशा आशयाचं उत्तर त्याने या टीकाकारांना दिलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

