बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांचे सध्या रिअॅलिटीशोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले जाते. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी चित्रपट अद्यापही कुठेतरी मागे पडतात असे चित्र असताना सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची आमिरने दखल घेतली आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ‘सैराट’ चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांचे झालेले कौतुक हा मराठी चित्रपटासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतून मिळालेला एक मोठा सन्मान मानला गेला. यावेळी प्रादेशिक भाषेमध्ये दमदार चित्रपट निर्मित होत असल्याचे सांगत आमिरने देखील ‘सैराट’, ‘नटसम्राट’ आणि ‘कोर्ट’ या मराठीतील चित्रपटांचे कौतुक केले होते. ‘सैराट’ या चित्रपटावेळी प्रादेशिक भाषांना व्यासपीठ मिळाले पाहिजे असे म्हणणाऱ्या आमिरने आपल्या आगामी ‘दंगल’ प्रदर्शनावेळी एका मराठी चित्रपटाची दखल घेतली आहे. त्यामुळे ‘दंगल’ पाहताना आपल्याला ‘ती सध्या काय करते…’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे.
प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या प्रसिद्धी मिळण्यासाठी आमिरने मराठीतील ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाच्या ट्रेलरला स्थान दिले आहे. आमिरच्या दंगल चित्रपटामध्ये कतरिना कैफच्या आणि रणबीर कपूरच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र ‘दंगल’ पाहताना आता मराठी चित्रपटाचा ट्रेलर दिसणार असून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आमिरच्या ‘दंगल’ या बहुचर्चित चित्रपटावेळी मराठी चित्रपटाचे प्रसिद्धी मिळणे ही मराठी चित्रपटासाठी अभिमानाचीच गोष्ट असेल.
याविषयी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाला की, इतक्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटासोबत ‘ती सध्या काय करते’चा ट्रेलर दाखविण्यात येणार असल्याने मी खूप आनंदात आहे’. ही मराठी चित्रपटासाठी नक्कीच मोठी बाब आहे. ‘दंगल’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित असा चित्रपट आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या चित्रपटासोबत एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर दाखविला जाणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. याचे श्रेय मी झी स्टुडिओजला सुद्धा देईन. ‘ती सध्या काय करते’चा ट्रेलर ‘दंगल’सोबत दाखविण्याची संधी दिल्याने मी आमिरचे आभार मानतो.
झी स्टुडिओज निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि ‘होणार सून मी या घरची’ मधून घराघरांत पोहोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.