कोणताही चित्रपट म्हटलं की त्यात चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतच त्याची प्रसिद्धी आलीच. त्यातही अभिनेता आमिर खानच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीचे फंडे काही वेगळेच असतात. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. कोणत्याही टेलिव्हीजन कार्यक्रमामध्ये जाऊन आमिर या चित्रपटाचे प्रदर्शन करणार नाहीये. पण, असे असले तरीही ‘दंगल’च्या बाबतीत प्रसिद्धीसाठी आमिर नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहे. या चित्रपटाच्याच प्रसिद्धीचा एक भाग म्हणून आमिर खानने मुंबईमध्ये या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे. या स्पेशल स्क्रिनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे या स्क्रिनिंगला भारतातील काही नावाजलेले कुस्तीपटू हजेरी लावणार आहेत.

वाचा: VIDEO: ‘दंगल’साठी आमिरचा ‘फॅट टू फिट’ प्रवास

रोजच्या जीवनात अगदी जवळून दंगल अनुभवणाऱ्या या कुस्तीपटूंच्या उपस्थितीमुळे चित्रपटाचे महत्त्व आणखीनच वाढत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार सुद्धा हजेरी लावणार आहे. आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही सुशील कुमारने हजेरी लावली होती. सुशील कुमारसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना आमिर म्हणाला की, ‘मी ज्यावेळी सुशील कुमारला भेटलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हटलेलं की, मला तुमच्यासारखी शरीरयष्टी करायची आहे. त्यावेळी बहुधा त्यांना मी मस्करी करत आहे असं वाटलं, कारण त्यावेळी मी खूप स्थुल होतो. पण, मी सुशीलप्रमाणे बनण्याचा ध्यास घेतला होता’. यापुढे आमिर असेही म्हणाला की, ‘या स्पेशल स्क्रिनिंगसाठी गीता-बबिता फोगट आणि महावीर सिंग फोगट यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे’. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगसाठी महावीर सिंग फोगट यांच्या संपूर्ण कुटुंबालाही बोलवण्यात आले आहे. आता अवघ्या काही दिवसांवरच ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रदर्शन उभे ठाकले आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनवर सर्व टीम काम करत आहे.

अभिनेता आमिर खान नेहमीच त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी नवीन वाटांवर जात असतो. त्यामुळे ‘दंगल’च्या निमित्तानेसुद्धा हा मिस्टर परफेक्शनिस्ट आपलेल सर्वस्व पणाला लावत पुन्हा एकदा या क्षेत्रातील त्याचे परफेक्शन सिद्ध करत आहे असेच म्हणावे लागेल. याआधी आमिरने ‘दंगल’ या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ‘दंगल’साठी आमिरने घेतलेल्या मेहनतीची एक झलक पाहायला मिळत आहे. ‘फॅट टु फिट’ असे म्हणत सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावरही चांगलाच गाजत आहे. आमिर खानचा हा बहुचर्चित ‘दंगल’ चित्रपट २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.