बॉलीवूडच्या बच्चन कुटुंबातील ‘बेबी आराध्या’ ही त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांइतकीच लोकप्रिय असल्याचा प्रत्यय दुबईत आला. ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दुबईत गेलेल्या अमिताभ बच्चन यांच्यामार्फत आराध्याच्या लहान चाहत्यांनी तिच्यासाठी भेटवस्तू पाठविल्या आहेत. ‘भूतनाथ रिटर्न्स’च्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी दुबईत गेलेले अमिताभ बच्चन मुंबईत परतले तेव्हा त्यांच्याकडे आराध्यासाठी तिच्या चाहत्यांनी दिलेल्या भेटवस्तू होत्या. दुबईत असताना एका लहान मुलीने आपण आणलेली भेटवस्तू आराध्याला देण्यासाठी अमिताभ यांच्याकडे सोपविली. परंतू, आपण आराध्यासाठी आणलेली भेटवस्तू अमिताभ यांनी बघावी असा आग्रह तिने धरला. अखेर अमिताभ यांनी ती भेटवस्तू पाहिल्यानंतर या लहान मुलीचे समाधान झाले. तसेच आपली भेटवस्तू आराध्यालाच द्यावी असे तिने अमिताभ यांना वारंवार सांगितले. या अनुभवाबद्दल सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले “लहान मुले किती साधेपणाने वागतात परंतु तरीही त्यांचे वागणे आपल्यावर परिणाम करून जाते.”