बच्चन कुटुंबातील सर्वात छोटी सदस्य आराध्या काही दिवसांपूर्वी सहा वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबियांनी दमदार पार्टीचे आयोजन केले होते. या थीम पार्टीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच मजा येईल अशा अनेक गोष्टींचा भरणा होता. स्वतः अमिताभ बच्चन यांनी या पार्टीतील काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. पण वाढदिवसाला एवढे दिवस उलटून गेले तरी तिच्या वाढदिवसाची क्रेझ काही कमी झालेली नाही. आजही तिच्या वाढदिवसाचे फोटो पाहण्यात अॅश- अभीचे चाहते व्यग्र असतात.

या पार्टीचे मुख्य आकर्षण होते ते आकाशपाळणा. अभिषेक बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत साऱ्यांनीच या पाळण्यात बसून आपल्या लहानपणीच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. या पाळण्यात फक्त शाहरुख आणि अभिषेकच नाही तर खुद्द ऐश्वर्या रायही बसली होती. अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आराध्या आणि ऐश्वर्याचा आकाशपाळण्यात बसलेला एक फोटो शेअर केला आहे. ‘आनंद’ असे छोटेसे कॅप्शन देऊन त्याने मोठा मेसेजच लिहिला आहे. त्याच्या आयुष्यातील खऱ्या आनंद हे आराध्या आणि ऐश्वर्याच आहेत असे त्याने अनेकदा सांगितले आहे.

आराध्याच्या बाबतीत अभिषेक आणि ऐश्वर्या दोघंही फार सजग आहेत. फक्त आई-बाबाच नाही तर लाडके आजोबाही आपल्या नातीची फार काळजी घेतात. कान महोत्सव २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, ‘आराध्याचे सर्वसामान्य मुलांप्रमाणे पालनपोषण होत असून ते तसेच राहावे असे सगळ्यांना वाटते. आम्ही तिला आमचे सिनेमे दाखवत नाही. पण तिला माहितीये की आपले आई-बाबा कोण आहेत. शहरात लागलेले आमचे पोस्टर्स पाहून तिला आता कळतंय की समाजात आमचं स्थान काय आहे.’