scorecardresearch

लवकरच ‘या’ मालिकेतून प्रेक्षकांना नव्याने भेटणार मोनिका बेदी

‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात येई पर्यंत तिची प्रतिमा प्रेक्षकांमध्ये चांगली नव्हती

लवकरच ‘या’ मालिकेतून प्रेक्षकांना नव्याने भेटणार मोनिका बेदी
अभिनेत्री मोनिका बेदी

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच अबू सालेमला दोन लाखांचा दंडदेखील ठोठावण्यात आला. अबू सालेमशी निगडीत कोणतीही गोष्ट समोर आली की आपसूक दुसरी गोष्टही समोर येते ती म्हणजे त्याची बहुचर्चित प्रेयसी मोनिका बेदी.

आवाज ऐकूनच अबू सालेमच्या प्रेमात पडले: मोनिका बेदी

अबू सालेम प्रकरणानंतर ती बॉलिवूडमधून जणू गायबच झाली होती. आता ती पुन्हा दिसणार नाही असेच सर्वांना वाटत असताना टीव्ही मालिका सरस्वतीचंद्रमधून तिने पुनरागमन केले. या मालिकेतील तिच्या अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली. यानंतर तिने बंधन मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. पण या मालिकांनंतर ती दुसऱ्या कोणत्याच कार्यक्रमात किंवा मालिकांमध्ये दिसली नाही.

पण आता मोनिकाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच ती टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. मासूम या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेत मोनिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाईफ ओके’ या वाहिनीवर मासूम मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेत मोनिकाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

‘जोडी नंबर वन’, ‘जानम समझा करो’, ‘प्यार, इश्क और मोहब्बत’ अशा सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिला पोर्तुगीज पोलिसांनी अबू सालेमसोबत अटक केली होती. या सर्व प्रकरणात तिचे करिअर रसातळाला गेले होते. काही वर्षांचा ब्रेक घेऊन तिने पुन्हा वर येण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. यानंतर मोनिकाने तिचे लक्ष छोट्या पडद्यावर वळवले.

https://www.instagram.com/p/BYbHa49jlK8/

‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात ती दिसली होती. यानंतर ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात येई पर्यंत मोनिकाची प्रतिमा प्रेक्षकांमध्ये फारशी चांगली नव्हती. पण ‘बिग बॉस’नंतर लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. तिच्या आयुष्याला कलाटणी देण्यात ‘बिग बॉस’चा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-09-2017 at 21:09 IST

संबंधित बातम्या