संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात करणी सेनेसोबत अनेक राजपूत संघटनांनी जनजीवन विस्कळीत केले होते. २४ जानेवारीला सिनेमा प्रदर्शित झाला असला तरी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि नंतरही या राजपूत संघटनांनी फार गोंधळ माजवला होता. अनेक चित्रपटगृहांची तोडफोड करण्यात आली आणि अनेक ठिकाणी जाळपोळ ही केली. हे कमी की काय राजपूत संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूग्राम येथील मुलांची शाळेची बस अडवली होती. या बसवर अनेकांनी दगडफेकही केली होती.
एका सिनेमासाठी संघटनांनी एवढ्या लोकांना वेठीस धरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता एजाज खानने राजपूत संघटनांबद्दल आपले मत मांडले आहे. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून सर्वांना परिचयाचा झालेल्या एजाजने आतापर्यंत बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. शनिवारी एजाजने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘आधी देश जाट समुदायाने जाळला, त्यानंतर राम रहीमच्या भक्तांनी आणि आता राजपूत देश जाळत आहेत. पण तरीही देशद्रोही मुस्लिम आहेत. जागे व्हा…’
देश पहले जाटों ने जलाया
फिर राम रहीम के भक्तों ने
अब राज़पूत ज़ला रहे है…
लेकिन देशद्रोही मुसलमान है! Bhakto jago
— Ajaz Khan (@AjazkhanActor) January 26, 2018
एजाज अनेकदा मुस्लिमांची मतं मांडताना दिसतो. अनेकदा सार्वजनिक मंचावर एजाज भाजप सरकार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या विरोधात बोलताना दिसतो. एजाजने त्याच्या या ट्विटमध्ये म्हटले की, ज्या लोकांना मुस्लिम देशद्रोही वाटतात त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.