तो उभा राहिला…
दुभंग घेतला पराकोटीच्या समाजसेवकाशी..
कधीतरी तो घेणारच होता…
लोकशाहीची कास धरण्यासाठी…
उपोषण, सत्याग्रह यातून बाहेर पडला…
स्वत:चा पक्ष काढला…
सत्तांध खूप हसले…
तरीही त्यांना नडला…
पक्षाच्या नावाला भांडवलदार खूप हसले…
सामान्य माणसाला सामान्य समजत मस्त फसले…
मी मी म्हणणारे समाजसेवक निवडणुकांपासून पळत होते…
त्यांचा प्रचारही नाही केला…
कुणाच्याही आशीर्वादाशिवाय
त्यानं विजय साकार केला…
त्यानं लोकशाही मार्गानं विजय साकार केला…
सामान्य माणूस आपला कर्ताकरविता होऊ शकतो
असा विश्वास निर्माण केला…
लोकशाहीचे हक्क लोकशाही पद्धतीनेच मागायचे असतात…
त्यासाठी घटनाबाह्य जाऊन स्वत:चे स्वप्नाळू आविष्कार करायचे नसतात…
इतके दिवस निवडणुका होत होत्या
उमेदवार जिंकतही होते, त्यांची विजयी मिरवणूकही निघत होती…
पण, माझी (आपली) लोकशाही मात्र हरत होती…
ज्या सगळय़ा गोष्टींवरून समाजाचा, जनमानसाचा विश्वास उडत चालला होता,
घटनात्मक मूल्यांचं उच्चाटन होत होतं..
लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली…
त्या सा-या मूल्यांची पुनर्पेरणी या पठ्ठय़ानं केली…
मला माझ्या मताची किंमत कळली…
सामान्य असूनही उलथापालथ करू शकतो
ही किमया उमगली…
आता ‘मी’ माझा ‘स्वत:’चा
पाईक माझ्या लोकशाहीचा…
माझं एक मत काय करू शकतं
याचा धडाच त्यानं दिला…
आम्हाला सोबत घेऊन
त्यानं दिल्लीचा तख्त भेदिला…
माझं मत माझा अभिमान…
हा देश माझा, माझा स्वाभिमान…
हम हमारा वोट हम कुछ भी कर सकते है…
बस एक वोट और हम किसी को भी बदल सकते है…
हा नवा श्वास आम्ही घेतला आहे…
आता हाच आमचा योगा, प्राणायाम तथा ध्यास आहे…
फक्त जास्त, अति होता कामा नये…
विजयाचं अजीर्णही होता कामा नये…
दुसरा स्वातंत्र्य लढा असा होरा मिरवताही कामा नये
कारण ते पारतंत्र्य होते… हे स्वातंत्र्य आहे…
ज्यांनी सत्तेचाळीसचे पेढे आपल्या मुखी घालून गोडवा आणला
त्यांचा अपमान करू नका
थोडय़ाशा यशानं ऊतू तर नकाच नका,
पण मातूही नका…

ता. क.
लोकशाही व्यवस्थेतल्या मूलभूत हक्कांना पुरेपूर उपभोगून हिटलरला पूजणा-यांचं काय?
आणि
मोठे व्हा, पण आमच्यापेक्षा मोठे होऊ नका असा शुभाशीर्वाद देणा-या समाजसेवकांचं काय…?
– मिलिंद शिंदे