बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नू कपूर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे.
६६ वर्षीय अन्नू कपूर हे एक अभिनेता, गायक, रेडिओ जॉकी आणि टेलिव्हिजन होस्ट आहेत. त्यांनी १०० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. मागील ४० वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध श्रेणींसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या १९७९ सालच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात अन्नू कपूर पहिल्यांदाच दिसले होते. त्यानंतर त्यांनी ‘बेताब’, ‘मंडी’, ‘आधारशिला’ आणि ‘खंडर”मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं.