scorecardresearch

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच अभिनेते किरण मानेंची पोस्ट, म्हणाले “कटकारस्थान रचून…”

काही महिन्यांपूर्वी अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या टीआरपीमध्ये झालेली घसरण आणि काही महिन्यांपूर्वी झालेला वाद याचे प्रमुख कारण असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान ही बातमी समजल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील भूमिका अभिनेते किरण माने साकारत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. दरम्यान या प्रकरणानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात ही मालिका बंद होणार आहे, ही बातमी समजताच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

“प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!!

जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.

ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.

…कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.

कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.

बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आले समोर

किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहे. खरय सर आमच्या घरातले रोज न चुकता पहायचे सिरिअल पण तुमचा विषय झाल्यापासून ती सिरिअल आमच्या घरात कुणीच पाहत नाही, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने तुमच्या जागी दुसरा माणूस.. कलाकार म्हणू आपण.. शोभनारच नाही त्या रोलसाठी इतकी प्रचंड किमया करून ठेवली आहे तुम्ही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor kiran mane comment on star pravah mulgi zali ho marathi serial to end soon facebook post viral nrp