देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तबलिगी जमातच्या अनेकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तबलिगी जमातच्या लोकांविरोधात कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे. अशातच अभिनेते मनोज जोशी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आरएसएस आणि तबलिगी जमातीचा उल्लेख केला आहे.

नुकताच मनोज जोशी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘जेव्हा कधी मी आरएसएसचा उल्लेख करतो तेव्हा लोकं माझ्या टाइमलाइनवर तबलिगी जमातीच्या लोकांसारखे वागू लागतात. असे का?’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट पाहून अनेकांनी त्यांना उत्तर दिले आहे.

एका यूजरने तर ‘बेरोजगारीचा परिणाम डोक्यावर झाला आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही फक्त चर्चेत येण्यासाठी ट्विट करत आहात. तुम्हाला आरएसएस आणि तबलिगीचा काही फरक पडत नाही’ असे म्हणत मनोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

तबलिगी जमात भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने तसेच पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत.