‘मालिक’ नही तो क्या हुआ… बन तो सकते है… हा अभिनेता राजकुमार रावचा या चित्रपटातला संवाद चित्रपटाचा कथाविषय समजून घेण्यासाठी पुरेसा बोलका आहे. खरंतर या एका संवादातून चित्रपटाचं कथानक काय असावं हेही एव्हाना ढिगाने या विषयावरचे चित्रपट ओटीटी आणि चित्रपटगृहातून कोळून प्यायलेल्या प्रेक्षकांना सहज लक्षात येईल. आणि तुमच्या मनात जे कथानक तयार झालं असेल, त्याला कुठेही तडा जाणार नाही इतका ढोबळपणा या चित्रपटात आहे. तरीही हा चित्रपट पाहण्याचं एकमेव कारण म्हणजे अभिनेता राजकुमार राव. त्याच्या अभिनयानेच या चित्रपटाला तारलं आहे.

‘मालिक’ पाहिल्यानंतर राजकुमार रावला हा चित्रपट का करावासा वाटला असेल? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि एकाअर्थी त्या प्रश्नाचं उत्तरही त्याच्या चाहत्यांना माहिती आहे. आजवर विविधांगी संवेदनशील भूमिका करणाऱ्या, तथाकथित मध्यमवर्गीय कुटुंबातील नायकाच्या भूमिका यशस्वीपणे साकारणारा अभिनेता म्हणून राजकुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला खुंटा निश्चितच बळकट केला आहे. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून लौकिक मिळवायचा तर रांगडी अॅक्शनदृश्ये देणारा तथाकथित ‘हिरो’वाला चित्रपट करायला हवा. आणि राजकुमारसाठी ‘मालिक’ हे ते निमित्त ठरला आहे.

अलाहाबादमधल्या एका गावातल्या शेतकरी कुटुंबाची ही कथा आहे. चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी ही ऐंशीच्या दशकातली आहे. शेतकऱ्याने जमीन कसायची, घाम गाळून पीक उगवायचं… पण त्याच्यावर हक्क कोणाचा? तर त्या जमिनीच्या मालकाचा. मालक म्हणजे देवासमान मानणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातला मुलगा दीपक (राजकुमार राव). मालकासमोर नाक घासणं त्याला आवडत नाही, पण न्याय मिळवायचा असेल तर सत्तेची नशा असलेल्यांच्या दुनियेत वावरणाऱ्यांकडे तो मागून मिळत नाही. तो खेचून मिळवावा लागतो. आता तो मिळवायचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा. सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकवण्यासाठी असे बेदरकार, जिवावर उदार होऊन टोकाचं काहीतरी करणारे तरुण हवेच असतात. दीपकला ही गोष्ट लक्षात येते आणि आपण असं केलं तर कोणाचा वरदहस्त आपल्याला मिळेल, याचीही कल्पना त्याला येते. आणि तो दीपक म्हणून नव्हे तर ‘मालिक’ होण्याचं त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणतो. मात्र, सतत गुंडगिरी करून पैसा मिळाला तरी आयुष्यात स्थैर्य मिळण्यासाठी तेवढं पुरेसं ठरत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचं स्वप्न तो पाहू लागतो आणि मग सत्तेला फुटलेले फाटे, त्याच्या वाटेत निर्माण झालेले काटे या सगळ्या गोष्टी त्याच्याभोवती आपला पाश आवळत जातात, असं या चित्रपटाचं सर्वसाधारण कथानक आहे.

‘मालिक’ या चित्रपटाची कथा-पटकथा आणि दिग्दर्शन पुलकित यांचं आहे. पुलकितने याआधी ‘भक्षक’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे त्याचं दिग्दर्शनाचं तंत्र सफाईदार आहे. ‘मालिक’सारख्या चित्रपटासाठी आवश्यक असलेला वेग, अॅक्शनदृश्यांची भरमार, सत्ताकारणासाठीचे आवश्यक घटक या सगळ्या गोष्टी चित्रपटात पुरेपूर आहेत. त्यामुळे चित्रपट सुरुवातीच्या काही दृश्यांत पाहणाऱ्याची थोडी पकड घेतो, मात्र हळूहळू कथानकातले सगळे कच्चे दुवे, त्याहीपेक्षा कुठल्याही प्रकारे नावीन्य नसल्याने पुढे काय घडणार हे प्रेक्षकाला आधीच लक्षात येते. आणि त्यातला प्रेक्षकाचा रस कमी होत जातो. अगदी सर्वसाधारण भूमिकेचेही सोनं करण्याची क्षमता असलेला राजकुमारसारखा उत्तम नट हाताशी असताना त्याला अगदीच सुमार कथानकात वापरण्याचा हा प्रकार चित्रपटाच्या अंगलट आला आहे. त्यातही विनाकारण लांबवलेलं कथानक, चाललाच तर सीक्वेल करू या विचाराने वाढवत नेलेली गोष्ट या सगळ्या प्रकाराने चित्रपट रटाळ झाला आहे.

बेफिकीर वृत्तीने वागणारा तरुण ते दाढीचं खुंट वाढवून वावरणारा, थंड डोक्याचा आणि खुनशी वृत्तीचा गुन्हेगार असलेला मालिक हे स्थित्यंतर राजकुमारने खुबीने रंगवलं आहे. अशा भूमिकांसाठी लागणारी देहयष्टी, देहबोली सगळ्यासाठी त्याने मेहनत घेतली आहे. या चित्रपटात त्याच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता राजेंद्र गुप्ता खूप काळाने दिसले आहेत. राजेंद्र गुप्ताही ताकदीचे कलाकार आहेत, त्यामुळे पडद्यावरच्या या बापबेट्यांमधली जुगलबंदी अधिक अनुभवायला मिळाली असती तर अधिक रंगत आली असली. सौरभ शुक्ला, स्वानंद किरकिरे, सौरभ सचदेवा, प्रोसेनजीत चॅटर्जी असे उत्तम कलाकार चित्रपटात आहेत. अभिनेत्री मानुषी छिल्लरचीही या चित्रपटातील भूमिका खूप सुंदर आहे. मात्र, कलाकार उत्तम असले तरी काही व्यक्तिरेखा विनाकारण चित्रपटात रेंगाळत राहतात, कथेला वळणही मिळत असलं तरी त्यात नवीन काही हाती लागत नाही. चित्रपटातील कथेचा काळ ही आणखी खटकणारी गोष्ट.

म्हणजे आजच्या काळात मिर्झापूरसारख्या वेबमालिकेचे सिक्वेल, ‘अॅनिमल’सारख्या वर्चस्ववादी नायक साकारणाऱ्या चित्रपटांची गर्दी असताना ऐंशीच्या दशकातली छोट्या-छोट्या टोळीचं कथानक सांगून काय साधायचं होतं हे कळत नाही. त्यामुळे केवळ राजकुमार रावचा अभिनय ही एकच काय ती चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. बाकी ‘मालिक’चा सिक्वेल आलाच तर प्रेक्षकांना कोणी वाली नाही.

मालिक

दिग्दर्शक – पुलकित

कलाकार – राजकुमार राव, मानुषी छिल्लर, राजेंद्र गुप्ता, अंशुमन पुष्कर, सौरभ शुक्ला, स्वानंद किरकिरे, सौरभ सचदेवा,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोसेनजीत चॅटर्जी.