बॉलिवूड आणि क्रिकेट हे दोन्ही ग्लॅमरस क्षेत्र आहेत. बहुदा त्याचमुळे या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडत असाव्यात. हरभजन सिंग-गीता बसरा, युवराज सिंग-हेजल किच, शर्मिला टागोर-मन्सूर अली खान पतौडी अशी क्रिकेटर-अभिनेत्री जोडप्यांची अनेक उदाहरणे देता येतील. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली हा देखील बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला डेट करत असून, हे दोघे त्यांच्या नात्याला लवकरच नाव देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, त्याआधीच आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना बोल्ड करणारा झहीर खान हा स्वतःच क्लीन बोल्ड झालाय. त्याला बोल्ड करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे सागरिका घाटगे.
सध्या आयपीएल सामन्यांमध्ये खेळत असलेल्या झहीर खान याने सागरिकासोबतचा फोटो ट्विट करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. या फोटोमध्ये सागरिकाच्या बोटात साखरपुड्याची अंगठीही दिसते. ३८ वर्षीय झहीर खान सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्त्व करतो आहे. आयपीएलमध्ये झहीरने ९५ सामने खेळले असून, त्याच्या नावावर ९९ विकेट्स जमा आहेत. झहीरच्या शंभराव्या विकेटआधीच सागरिकाने त्याची विकेट काढली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांपासून झहीर खान आणि सागरिका घाटगे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. युवराज आणि हेजलच्या लग्नामध्येही हे दोघे एकत्र दिसले होते. त्यावेळी तर या दोघांमधील प्रेमसंबंधांच्या चर्चांना अधिकच उधाण आले. अखेर फेब्रुवारीमध्ये सागरिकाने झहीरवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. झहीरने मागणी घेतल्यावर लगेच होकार देणाऱ्या मराठमोळ्या सागरिकाबद्दल जाणून घेऊया.
बॉलिवूडमध्ये आपले दमदार आगमन व्हावे असे प्रत्येक नवकलाकाराला वाटते. त्यात जर पदार्पणातील पहिलाच चित्रपट शाहरुख खानसोबत असेल तर त्या कलाकाराचा आनंद गगनात मावत नाही. हीच संधी सागरिकाला मिळाली. ‘चक दे इंडिया’ या हिट चित्रपटात तिने प्रिती सभरवाल या स्टार हॉकीपटूची भूमिका साकारली.
‘चक दे इंडिया’नंतर सागरिकाने ‘फॉक्स’ आणि ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही साकारल्या. इमरान हाशमी आणि नेहा धुपिया यांच्यासोबत ती ‘रश’ चित्रपटातही झळकली.
सागरिकाने काही प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले. अभिनेता अतुल कुलकर्णीसोबत तिने ‘प्रेमाची गोष्ट’ केला होता. ‘दिलदारियाँ’ या पंजाबी चित्रपटातही ती झळकली होती.
यावर्षी तिने नसिरुद्दीन शाह आणि अर्षद वारसी यांच्यासोबत ‘इरादा’ चित्रपटात काम केले.
Partners for life !!! #engaged @ImZaheer pic.twitter.com/mRxjpQJfID
— Sagarika Ghatge (@sagarikavghatge) April 24, 2017
Never laugh at your wife's choices. You are one of them !!! Partners for life. #engaged @sagarikavghatge pic.twitter.com/rUOtObFhiX
— zaheer khan (@ImZaheer) April 24, 2017
३१ वर्षीय सागरिकाने ‘फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी’च्या सहाव्या सिझनमध्येही भाग घेतला होता. यात तिने अंतिम फेरी गाठली होती.