|| गायत्री हसबनीस
‘८३’ सिनेमाच्या यशानंतर ‘मर्दानी’, ‘काय पो छे’ अशा आगळ्यावेगळ्या चित्रपटांतून कणखर भूमिका साकारणारा अभिनेता ताहिर राज भसीन हा आता वेबमालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्या पहिल्याच सत्तरच्या दशकातील प्रेमकथेवर आधारित ‘रंजिश ही सही’ या वेबमलिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही मालिका वूटवर १३ जानेवारीला प्रदर्शित झाली. ‘लोकसत्ता’शी बोलताना आपल्या नव्या कामाविषयी आणि भूमिकेविषयी ताहिरने मनमोकळेपणाने संवाद साधला.




आपल्या प्रत्येक पात्रातून वेगवेगळया पद्धतीने अभिनय करणाऱ्या खलनायकापासून नायकापर्यंत अभिनयाच्या नाना छटांचा समतोल साधत ताहिर राज भसीनने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे त्यामुळे ‘रंजिश ही सही’च्या निमित्ताने ताहिरकडून नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. या वेबमालिकेत तो दिग्दर्शकाची भूमिका करतो आहे. ‘‘मी साकारलेला हा दिग्दर्शक असा आहे, ज्याला बॉलीवूडमधील एका मोहक अभिनेत्रीबद्दल विलक्षण आकर्षण तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या सुंदर व सुशील पत्नीवरही त्याचे नितांत प्रेम आहे. त्यामुळे असा एक तरुण वयातील पुरुष जो आपल्या करिअरला कंटाळला आहे, जो सतत फ्लॉप चित्रपट लिहितो आहे, पण तरीही यशाची आशा बाळगून आहे. तारेवरची कसरत करत खऱ्या आयुष्यात या दोन स्त्रियांच्या असण्याने स्वत:चे आयुष्य तो कसे बदलून घेतो याचे चित्रण या कथेत आहे,’’ असे तो आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो. कथा जुन्या काळातील म्हणजे सत्तरच्या दशकातील असली तरी त्याचा आशय आजच्या काळातही तितकाच समर्पक आहे. शंकर नावाचा होतकरू दिग्दर्शक मी साकारतो आहे. त्याने तीन फ्लॉप चित्रपट लिहिले आहेत, पण लवकरच एक हिट चित्रपट लिहायचे स्वप्न तो उराशी बाळगून आहे. या प्रवासात त्याचा आत्मशोध सुरू आहे, त्यात त्याला विविध वळणावर विविध माणसे भेटतात आणि या सगळ्या रगाड्यात एका चांगल्या कथेचा शोधही तो घेतो आहे. त्यामुळे चहूबाजूने त्रासलेला असताना त्याच्या आयुष्यात एक स्त्री येते आणि शंकर कसा त्यामुळे बदलून जातो याची रंजक कथा म्हणजे ‘रंजिश ही सही’ म्हणता येईल, असं तो सांगतो.
या मालिकेचे लेखन आपल्याला विशेष आवडले, असं तो नमूद करतो. ‘‘ जेव्हा मी ही संहिता वाचली त्याचक्षणी माझ्या लक्षात आले की, माझ्यासाठी ही कथा समजायला फार अवघड नाही. अत्यंत सोप्या आणि प्रवाही पद्धतीने लिहिलेल्या या कथेतील पात्र आणि त्यांच्या आजूबाजूचं गुंतागुंतीचं भावविश्व हे वाचणाऱ्यालाही मंत्रमुग्ध करणारं असं होतं. त्यामुळे पडद्यावर ही कथा आकार घेईल तेव्हा प्रेक्षक नक्की त्या कथेशी जोडले जातील, हरवतील, असा विश्वास मला वाटला,’’ अशा शब्दांत या वेबमालिकेच्या लेखकाचेही ताहिरने भरभरून कौतूक केले. चित्रपट असो वा वेबमालिका कथा उत्तम असेल तर कलाकारांनाही त्यांचे काम हमखास यश देऊन जाते, हा सध्याचा अनुभव असल्याचे त्याने सांगितले. त्याची ‘छिछोरे’तील व्यक्तिरेखाही खूप गाजली आणि त्याचा फायदा अर्थातच त्याला इतर भूमिका मिळवण्यासाठी झाला.
या वेबमालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर त्यात प्रेम, वासना, गुन्हा, नाट्य, रहस्य या सगळ्याचा भडिमार असावा असे वाटते. ताहिरला मात्र तसे वाटत नाही. या कथेत मानवी स्वभावाचे खूप उत्तम चित्रण करण्यात आले आहे, असे तो म्हणतो. १९७०चा हा काळ असल्याने तेव्हाचा लूक, एकूण देहबोली अशा विविध गोष्टींवर त्याला मेहनत घ्यावी लागली. याविषयी बोलताना तो म्हणतो, ‘‘खरंतर या मालिकेतून त्या काळातील फॅशन व्यवस्थित साकारणं महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर दोन वेगळ्या स्त्री व्यक्तिरेखांबरोबर काम करणं मला आव्हानात्मक वाटलं. कारण दोन्ही स्त्रियांबरोबर नायकाचं नातं वेगवेगळं आहे. त्यामुळे तो आलेख दोन्हीकडे उंचावत ठेवणे माझ्यासाठी गरजेचे होते. आता मी एका स्त्री पात्राबरोबर एक दृश्य देतो आहे, तर तासाभराने मला दुसरीसोबत दुसरे दृश्य द्यायचेआहे. तेव्हा दोन्हीकडे शंकरची व्यक्तिरेखा समान पातळीवर ठेवून त्याचे दोघींसोबतचे नाते तेवढेच अभिनयातून दाखवणे हे आव्हानात्मक होते,’’ चित्रीकरणही त्या काळातील संदर्भ लक्षात घेऊन केलेले आहे. तेव्हाचा समाज काही स्मार्टफोन वापरत नव्हता त्यामुळे या मालिकेतून आपल्यालाही तो स्मार्टफोन नसलेला काळ पडद्याआड अनुभवता आला असे त्याने सांगितले. ‘‘हो, खरंच आपण सर्वच स्मार्टफोनला चिकटून असतो, पण या मालिकेच्या कथेनुसार स्मार्टफोन कॅमेऱ्यासमोर येणे शक्यच नव्हते त्यामुळे मीही माझा फोन तासन् तास वॅनिटीमध्ये बंद करून ठेवायचो आणि स्मार्टफोनपासून दूर राहिल्याने स्वत:त झालेले सकारात्मक बदलही मी अनुभवले. फोन हातात नसल्याने मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी झालो. त्याचबरोबर त्या काळात लोक कसे फोन, गॅजेट्सशिवाय सुखी होते त्याचा अनुभवही मला मिळाला.’’ असे तो हसतहसत सांगतो.
या मालिकेत त्याचा लूकही वेगळा असल्याने व्यायाम आणि आहार याबाबत आपण अधिक जागृत होतो, असे त्याने स्पष्ट केले. ‘‘हे पात्र अगदी तरुण नाही ते थोडेसे प्रौढ आहे त्यामुळे ते तसे दिसण्यासाठी मला ७-९ किलो वजन कमी करावे लागले तेही दोन महिन्यांत. मी कार्डिओ करायचो त्याचबरोबर माझे डाएटही कडक सुरू होते,’’ असे त्याने सांगितले.
त्या काळातील संगीत
शंकर या पात्राची ओळख जेव्हा या मालिकेच्या सुरुवातीला होते तेव्हाचे ते दृश्य मला प्रचंड आवडते. त्या काळातील हा गरीब, साध्यासरळ स्वभावाचा तरुण पाश्र्वसंगीत आणि प्रकाशयोजनेतून इतका समर्पकपणे कॅमेऱ्यातून उतरला आहे की, मला तो भागच मुळात खूप आवडतो. ज्यासाठी मी पाच टेक्स दिले. त्या काळातील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे ‘संगीत’. या मालिकेतूनही ते खूप उत्कृष्टपणे आले आहे. मी फार खुलासा करणार नाही, पण या मालिकेच्या निमित्ताने तो काळ आणि त्या काळातील ते संगीत महेश भट्ट यांच्या शैलीतून प्रेक्षकांना ऐकल्यावर नक्कीच आनंद होईल याची खात्री वाटते, असे ताहिर आनंदाने सांगतो.
महेश भट्ट विद्यापीठ
‘‘महेश भट्ट हे सिनेमाचे एक विद्यापीठ आहेत. प्रत्येक अभिनेत्यासाठी त्यांच्याकडून शिकणे याहून मोठे भाग्य नाही. मलाही ती संधी मिळाली. त्यांच्याकडून नव्याने अभिनयाच्या आणि या क्षेत्रातील गोष्टीही शिकता आल्या. मला येथे प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की आमचा लेखक- दिग्दर्शक पुष्पदीप भारद्वाज हा एक तरुण आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक आहे. त्यामुळे नवीन पिढीकडून येणारे विचार आणि महेश भट्ट यांच्या अनुभवाची जोड असा वेगळा योग मालिकेच्या निमित्ताने जुळून आला होता. तीस वर्षांहूनही जास्त अनुभवी व्यक्तीकडून मिळणाऱ्या सूचना सेटवर काम करत असताना फार महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे खरोखरच हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता, असे तो सांगतो.