दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देवाप्रमाणे पुजल्या जाणाऱ्या सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याची सुवर्णसंधी काही नशीबवान कलाकारांनाच मिळते. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका साकारण्याचं अनेक कलावंतांचं स्वप्न असतं. असंच स्वप्न एका अभिनेत्रीनं पाहिलं आणि तिचं हे स्वप्न खरंही झालं. एका मराठमोळ्या अभिनेत्रीला ही संधी मिळाली आहे. मूळची नाशिकची असलेली अभिनेत्री अंजली पाटील रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

रजनीकांत यांच्या आगामी ‘काला कारिकालन’ या चित्रपटात अंजली महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्यासोबत काढलेला एक सेल्फी पोस्ट केला आहे. ‘सर्वांत विनम्र आणि दयाळू व्यक्तीला मी भेटले. त्यांच्याकडून खूप काही शिकायचं आहे,’ असं कॅप्शन तिने या सेल्फीला दिलंय. सोशल मीडियावर अंजलीचा हा सेल्फी चांगलाच हिट ठरतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘काला कारिकालन’ या तामिळ चित्रपटाची निर्मिती रजनीकांत यांचा जावई धनुष करणार आहे. तर पी. रणजीत याचं दिग्दर्शक करणार आहेत. रणजित यांनी ‘कबाली’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अंजली या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. याआधीही तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. ‘ना बंगारु तल्ली’ या तेलुगू चित्रपटात अंजलीने भूमिका साकारली. तर ‘चक्रव्यूह’ आणि ‘फाईंडिग फॅनी’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली. अंजलीच्या साकारलेल्या दमदार भूमिकांची अनेकांकडून स्तुतीही झाली. ‘विथ यू विदाऊट यू’ या श्रीलंकन चित्रपटासाठी तिला गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘सिल्वर पिकॉक’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ‘काला कारिकालन’ या चित्रपटात अंजलीसोबत अभिनेत्री हुमा कुरेशीदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.