पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी, २० सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलीस निरीक्षक सुरज गवस यांनी या संदर्भात इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. ‘गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि खाडीत जाऊन कोसळली. सकाळी सात वाजता अग्निशमन दल तेथे पोहोचले आणि त्या दोघांना गाडीमधून बाहेर काढले’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईश्वरीने आजवर काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. काही दिवसांपूर्वी तिने मालिकांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. ईश्वरी आणि शुभम हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पुढच्या महिन्यात ते साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.