प्रिती झिंटा पाठोपाठ बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर देखील लग्न बंधनात अडकली आहे. काश्मीर स्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसेन अख्तर मिर याच्यासोबत उर्मिलाने लग्नगाठ बांधली. उर्मिलाच्या विवाह बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एका हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.

उर्मिलाचा जवळचा मित्र आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा विवाह समारंभाला उपस्थित होता. विवाह सोहळा हा कोणताही तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीत व्हावा असा आम्ही दोघांनी आणि कुटुंबियांनी ठरविले होते. आमच्या नव्या आयुष्यासाठी आम्हाला केवळ चाहत्यांच्या आणि वडिलधाऱया व्यक्तींच्या आशिर्वादाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उर्मिलाने यावेळी दिली.

बॉलीवूडकरांचे शुभमंगल ‘सावधान’!

उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’. ‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’ ही नावेच तिच्या विविधतेचा छानसा प्रत्यय देतात. त्याशिवाय ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले आहे.