बोल्ड फोटोशूट किंवा न्यूड फोटोशूट हे साधारणपणे बॉलिवूड अभिनेत्रींनी केल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. त्यांच्या तुलनेत मराठी अभिनेत्रींनी मात्र असं न्यूड फोटोशूट करण्याचं धाडस केल्याचं अद्याप कोणाच्याही पाहण्यात नसेल. परंतु, या सगळ्याला छेद दिला तो अभिनेत्री वनिता खरातने. थेट न्यूड फोटोशूट करत वनिताने तिच्यातील आत्मविश्वास संपूर्ण कलाविश्वाला दाखवून दिला. त्यामुळेच सध्या तिची सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये चर्चा सुरु आहे. एकीकडे वनिताच्या आत्मविश्वासचं कौतुक होत आहे. तर, काही जणांनी तिच्यावर टीकादेखील केली आहे. त्यामुळेच तिने बोल्ड फोटोशूट नेमकं कोणत्या कारणासाठी केलं हे तिने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत वनिताने तिच्या न्यूड फोटोशूटविषयी भाष्य केलं आहे. हे फोटोशूट करण्यामागे एक खास हेतू होता, असं तिने सांगितलं.

“वजन वाढल्यामुळे स्वत:ला कमी लेखणारे अनेक जण आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. वजन जास्त आहे, म्हणजे आपण सुंदर दिसत नाही अशी अनेकांची समजूत झालेली असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यातील आत्मविश्वास कमी असलेला दिसतो. यात पुरुष मंडळीही अपवाद नाहीत. मात्र, यात स्त्री वर्गामध्ये वजनाविषयी अनेकदा अस्वस्थता पाहायला मिळते. त्यामुळे मला त्यांच्या याच भावनेला, विचारसरणीला छेद द्यायचा होता”, असं वनिता म्हणाली.

वाचा : कधी न्यूड, तर कधी साजशृंगार! वनिता खरातचा हटके अंदाज

पुढे ती म्हणते, “तुमचं वजन, तुमचा रंग, तुंमचा आकारमान यावर तुमचं सौंदर्य आधारित नसतं. आपण सगळेच सुंदर आहोत, हा साधा विचार स्वत:सह समाजात रुजवणं हाच माझा निव्वळ हेतू होता. पण लोकांचा प्रश्न होता की न्यूड फोटोशूटच का? तर, यात काय वाईट आहे. जन्मत: आपण सगळेच नग्न असतो. मग, त्या नग्नतेला अश्लील मानायचं का? कलाविश्वात वजानामुळे भेदभाव, हेटाळणी सहन करावी लागल्याचंदेखील तिने सांगितलं. मला सतत आई, काकू, मोलकरीण अशाच भूमिकांसाठी विचारलं जातं. ”

दरम्यान, सौंदर्याची परिभाषा ही रंग, रुप किंवा देहरचनेवर आधारित नसून खरं सौंदर्य हे आत्मविश्वास आणि स्वत: वर असलेलं प्रेम यावर आधारित आहे हे वनिताने दाखवून दिलं. शाहिद कपूरचा तुफान गाजलेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात वनिताने पुष्षा ( शाहिद कपूरची मोलकरीण) ही भूमिका साकारली होती.