गेल्या काही दिवसांपासून गायक-संगीतकार अदनान सामीला पाकिस्तानी ट्रोलर्सकडून लक्ष्य केलं जात आहे. या ट्रोलर्सना कसा सामोरं जातोस असा प्रश्न विचारणाऱ्या अदनानने ट्विटरवर उत्तर दिलं. या उत्तराने त्याने पाकिस्तानी ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे.

‘तुला ट्विटरवर पाकिस्तानी युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. या गोष्टींना तू कसा सामोरं जातोस,’ असा प्रश्न एकाने अदनानला विचारला. त्यावर अदनानने उत्तर दिलं, ‘प्रिय मित्रा, ते स्वत: असहाय्य, निराश आणि भरटकलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील राग ते माझ्यावर काढत आहेत. अशा लोकांना मी माफ करतो आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. ते सर्व पीडित आहेत.’

आणखी वाचा : ..म्हणून ऋषी कपूर यांना न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये समजलं होतं वेटर 

मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी ट्रोलर्सनी भारतीय कलाकारांवर टीका करण्यास सुरूवात केली होती. त्यात अदनानलाही लक्ष्य केलं होतं. ‘अदनान तुझ्यात हिंमत असेल तर कश्मीरच्या प्रश्नावर ट्विट करुन दाखव. मग पाहूया तुझा भारत तुझी काय आवस्था करतो’ असे ट्विट पाकिस्तानी युजरने केले होते. त्यावर अदनान सामीने लगेच प्रत्युत्तर दिले होते. ‘का नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी संबंध नाही त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका’ असे सडेतोड उत्तर अदनानने दिले होते. त्याच्या या उत्तराने अनेकांची मनं जिंकली होती.