अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ आणि मल्टिस्टारर ‘पद्मावत’ हे दोन्ही सिनेमे एका दिवसाच्या फरकाने प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता तुम्ही म्हणाल की, एकाच दिवशी दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. शाहरुख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ २५ जानेवारी २०१७ याच दिवशी प्रदर्शित झाला होता. यावेळी २६ जानेवारीला नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारी सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण २५ तारखेला ‘पॅडमॅन’ आणि २६ तारखेला ‘पद्मावत’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार म्हणून ‘अय्यारी’च्या निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.instagram.com/p/BcwhN_6gh4l/
मनोज बाजपयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘अय्यारी’ सिनेमा २६ जानेवारीऐवजी ९ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीपासूनच ‘पॅडमॅन’ आणि ‘अय्यारी’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे कोणत्यातरी एका सिनेमाला याचा फटका बसणारच होता. पण आता अय्यारीने एक पाऊल मागेच घेण्याचे ठरवले आहे.
‘अय्यारी’च्या निर्मात्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले की, ”पद्मावती’ आणि ‘पॅडमॅन’ हे दोन्ही सिनेमा एकत्र प्रदर्शित होत असल्यामुळेच आम्ही आमच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’ तर ‘पॅडमॅन’ची निर्माती प्रेरणा अरोडाच्या मते, ”पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ सिनेमे एकत्र प्रदर्शित होत असल्याने फारसा काही फरक नाही. याउलट दोन चांगले सिनेमे एकाचवेळी प्रदर्शित होत आहेत याचा आम्हाला आनंद आहे,’ असं ती म्हणाली.