बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अजय देवगणचा आज ५१वा वाढदिवस. ‘फूल और कांटे’पासून ‘तान्हाजी’पर्यंत अजयने दमदार भूमिका साकारल्या आहेत. नव्वदच्या दशकात करिअर सुरू करणारा अजय प्रत्येक चित्रपटासाठी तगडं मानधन घेतो. शाही लाइफस्टाइलचा तो शौकीन आहे. सर्वांत महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार २००६ मध्ये अजयने Maserati Quattroporte ही अत्यंत महागडी गाडी खरेदी केली होती. या कारची किंमत जवळपास २.८ कोटी रुपये इतकी होती. याशिवाय त्याच्याकडे रेंजरोव्हर वोग ही गाडीसुद्धा आहे. या गाडीची किंमत २.७ कोटी रुपये आहे. इतकंच नव्हे तर मर्सिडीज बेंज एस क्लास कारसद्धा त्याच्याकडे आहे. या लक्झरी कारची किंमत १.४ कोटी रुपये आहे आणि सेलिब्रिटींमध्ये ही कार फार लोकप्रिय आहे.

पाहा व्हिडीओ : जेव्हा अजयला मारण्यासाठी जमावाने घातला होता घेराव

अजय टू-सीटर कार बीएमडब्ल्यू जेड ४ या गाडीचाही मालक आहे. ही गाडी तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे. या कारची किंमत जवळपास ९८ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे रॉल्स रॉयस कलीननसुद्धा आहे. या सुपर लक्झरी कारची किंमत ६.९५ कोटी रुपये इतकी आहे. ‘सूर्यवंशी’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी तो याच कारमधून आला होता. तर ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या प्रीमिअरलासुद्धा तो याच गाडीतून आला होता.

अजय बॉलिवूडमधल्या निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्याकडे प्राइव्हेट जेट आहे. त्याने २०१० मध्ये ही जेट विकत घेतली होती. शूटिंग, प्रमोशन्स आणि पर्सनल ट्रिप्ससाठी तो या जेटचा वापर करतो. या हॉकर ८०० जेटची किंमत जवळपास ८४ कोटी रुपये आहे असं कळतंय. मात्र काही कारणास्तव अजयने हा जेट विकला, अशीही चर्चा आहे.