दिग्दर्शक इंद्र कुमारच्या २००७ मध्ये आलेल्या ‘धमाल’ आणि २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डबल धमाल’ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले होते. आता धमाल सीरिजमधील तिसरा चित्रपट काढण्याचा इंद्र कुमारचा मानस आहे. ‘टोटल धमाल’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात अजय देवगणची यावेळी वर्णी लागली आहे. पण यावेळीस संजय दत्त या सिक्वलमध्ये दिसणार नाही. अजय व्यतिरीक्त चित्रपटात अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि आशीष चौधरी यांच्याही भूमिका असणार आहेत. हा एक अॅडल्ट कॉमेडी चित्रपट असल्यामुळे तसेच तारखा नसल्याने संजूबाबाने चित्रपटाला नकार दिल्याचे समजते.
वाचा : मुलगा आर्यनमुळे आयफा सोहळ्याला मुकणार किंग खान?
‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’मध्ये अजय देवगण नव्हता. दरम्यान, धमाल सीरिजमध्ये पहिल्यांदाच दिसणाऱ्या अजयने या चित्रपटासाठी तब्बल ३५ कोटी रुपये मानधन मागितल्याचे कळते. विशेष म्हणजे हे केवळ ३० दिवसांचेच मानधन आहे. संजय दत्त सध्या इतर काही चित्रपटांचे चित्रीकरण करत असल्याने त्याच्याकडे २०१८ पर्यंत तारखा उपलब्ध नाहीत. त्यामुळेच त्याच्या जागी अजयला घेण्यात आल्याचे म्हटले जातेय. तसेच, संजूबाबाला आता अॅडल्ट कॉमेडी चित्रपटात काम करणे योग्य वाटत नाही. आपल्या मुलाने आपल्याला अशा चित्रपटात काम करताना पाहू नये, अशीच त्याची इच्छा आहे. ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’मध्ये संजूबाबाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याव्यतिरीक्त ‘साहेब बीवी और गँगस्टर’ चित्रटातही तो दिसणार आहे. २०११मध्ये आलेल्या ‘साहेब बीवी और गँगस्टर’ मध्ये रणदीप हुड्डाने गँगस्टरची भूमिका साकारली होती. तर २०१३मध्ये आलेल्या चित्रपटात ही भूमिका इरफान खानने केली होती.
वाचा : रणबीरला फक्त ५००० रुपये देण्यासही शाहरुखचा नकार
तसेच, संजय दत्तवरील बायोपिकचे कामही सध्या जोरात सुरु आहे. दिग्दर्शक राज कुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर संजूबाबाच्या भूमिकेत दिसेल. संजूबाबाच्या लूकमधील रणबीरचे फोटो याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात रणबीर हुबेहुब बॉलिवूडच्या ‘खलनायका’प्रमाणेच दिसतो.