बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवाय’ या आगामी चित्रपटाचे सध्या बल्गेरियात चित्रीकरण सुरू आहे. नुकतेच अजयने बल्गेरियाच्या बर्फाच्छादीत प्रदेशात येथील सर्वात पिरिन पर्वतरांगांमध्ये उंच शिखरावर एका कठीण सीनचे चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रीकरणाचा थरारक व्हिडिओ अजयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला असून, हा अत्यंत कठीण सीन नियोजित वेळापत्रकानुसार चित्रीत केल्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले आहेत.
व्हिडिओमध्ये अजय एका बर्फाच्छादित डोंगरावर उभा असलेला पाहायला मिळतो. त्याच्या भोवती हेलिकॉप्टर घिरट्या घालत असून, तो न डगमगता आपला टेक उत्कृष्टरित्या पूर्ण करतो. टेक पूर्ण झाल्यानंतर क्रू मेंबर्स अजयकडे धाव घेऊन त्याला जॅकेट देऊन स्कूटरवर बसवून त्याला हॉटेलच्या दिशेने रवाना करताना दिसतात.
चित्रीकरण करण्यात आलेल्या ठिकाणी दरवर्षी बल्गेरियातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात येते. अजयने चित्रीकरण केलेल त्या दिवशी येथील तापमान -१९ अंश सेल्सियस इतके होते. त्यामुळे अजयची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी अजयला दोन दिवसांच्या आरामाचा सल्ला दिला. तरीही अजयने चित्रीकरण पुढे न ढकलता पुढील अर्ध्यातासात तो सेटवर पोहोचला आणि चित्रीकरण पूर्ण केले.
‘शिवाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द अजय देवगण करत असून, हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn extreme difficult shoot in bulgaria for shivaay shares video
First published on: 18-04-2016 at 20:05 IST