लॉकडाउनदरम्यान सर्वसामान्यांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र या सर्वसामान्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ट्रक ड्राइव्हर्स दिवसरात्र काम करत आहेत. या ट्रकचालकांचं कौतुक करणारा एक व्हिडीओ अभिनेता अजय देवगणने शेअर केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांची फार पसंती मिळत आहे.

अजयने शेअर केलेला हा व्हिडीओ एका जाहिरातीचा आहे. देशसेवेसाठी निघालेल्या जवानाला एक ट्रकचालक लिफ्ट देतो. त्या प्रवासादरम्यान तो जवानांच्या कामाचं कौतुक करत असतो. मात्र जेव्हा तो जवान ट्रकमधून उतरतो तेव्हा तो म्हणतो, “आम्ही ज्याप्रकारे सीमेवर रक्षण करायला उभे आहोत, त्याप्रकारे तुम्ही लोकांच्या सेवेसाठी ट्रक चालवत आहात. आपण सर्वजण मिळून देशाचं भविष्य लिहितोय.” करोना व्हायरसला न घाबरता, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तू, सामान पोहोचवणाऱ्या ट्रकचालकांचं या व्हिडीओच्या माध्यमातून कौतुक करण्यात आलं आहे.

अजयने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘दोघांनाही आमचा सलाम’, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.