बॉलिवूडमधले क्यूट कपल अशी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची ओळख आहे. मिसेस फन्नीबोन्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या ट्विंकलने नुकताच तिचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. साऊथ आफ्रिकेच्या केप टाऊन येथे संपूर्ण कुटुंबियांसोबत अक्षयने तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. ट्विंकल आणि अक्षयची ही आवडती जागा आहे.

अक्षयने सोशल मीडियावर ट्विंकलला वाढदिवसाचा शुभेच्छा देत छानसा मेसेज लिहिला होता. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘तुझे प्रेम, विनोद बुद्धी आणि वेडपण मला प्रत्येक दिवशी तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतं. वाढदिवसाच्या शुभेच्छा टिना.. कधीच बदलू नकोस.’

संपुर्ण कुटुंब केप टाऊनमध्ये अजून काही दिवस राहणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत अक्षय आणि ट्विंकल त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथूनच करणार आहेत. या दिवशी ट्विंकलच्या मात्र संमिश्र भावना होत्या. तिचे बाबा म्हणजेच बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा वाढदिवसही याच दिवशी असतो. तिने आपल्या वाढदिवसाचे ट्विट करताना म्हटले की, ‘मी फार नशीबवान आहे की माझ्या बाबांच्याच वाढदिवसासोबत माझा वाढदिवस येतो. आता मित्र, परिवार, वाइन, चिज आणि बाबांचे आवडते क्रिम ब्रुली.’

तिच्या आधीच्या ट्विटमध्ये तिने राजेश खन्नासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘मला तुम्ही प्रत्येक गोष्टीत दिसता, माझ्या प्रतिबिंबात तुम्ही दिसता, बहिणीच्या चेहऱ्यावर तुमचे प्रतिबिंब दिसत, माझ्या मुलाच्या भुवयांच्या आकारात मी तुम्हाला अजूनही पाहू शकते.’
त्यांच्या कुटुंबासोबत आरवही होता. कुटुंबाशिवाय अक्षय आणि ट्विंकलसोबत त्यांचे जवळचे मित्रही होते.