अक्षयला फोटोशूट करताना वॉचमनने दिलं होतं हाकलून; त्याच ठिकाणी घेतलं स्वत:चं घर

जुहू समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्याजवळ ३२ वर्षांपूर्वी अक्षय फोटोशूट करत असताना बंगल्याच्या वॉचमनने दिलं होतं हाकलून

akshay kumar
अक्षय कुमार

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारने बरीच मेहनत करून कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत त्याचे आज चाहते आहेत. एका व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या घर घेण्यामागणी एक रंजक कहाणी सांगितली होती. ३२ वर्षांपूर्वी ज्या बंगल्याजवळ फोटोशूट करताना अक्षयला वॉचमनने हाकललं होतं, त्याच ठिकाणी नंतर त्याने स्वत:चं घर विकत घेतलं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षय एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. काही महिन्यांनी तो अक्षयचा फोटोशूट करून देईल या आशेने त्या फोटोग्राफरकडून अक्षयने पगार घेतला नव्हता. चार-पाच महिन्यांनंतर अक्षय त्याला म्हणाला, “जयेश जर तुझी काही हरकत नसेल तर माझा एक फोटोशूट करशील का, त्याबदल्यात तू मला पगार नाही दिलास तरी चालेल.”

https://www.instagram.com/p/B-CPAYzn60G/

त्याने होकार देताच फोटोशूटसाठी दोघंही जुहू समुद्रकिनाऱ्याजवळील एका बंगल्याजवळ पोहोचले. त्या बंगल्याची जागा अक्षयला खूप आवडली होती, त्यामुळे दोघांनी तिथेच फोटोशूट करायचं ठरवलं. चार-पाच फोटो काढून झाल्यावर बंगल्याचा वॉचमन तिथे आला आणि त्याने दोघांनाही हाकललं. यासंदर्भात सांगताना अक्षय पुढे म्हणाला, “माझा असा काही विचार नव्हता पण सध्या मी ज्या घरात राहतो, ते घर त्याच जागी आहे. बंगल्याच्या जागी नंतर एक इमारत बांधली गेली आणि त्याच इमारतीत मी राहतोय.” या व्हिडीओत त्याने दोन्ही फोटोसुद्धा दाखवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar was shooed away by watchmen during photoshoot 32 years ago now owns house at same location ssv