सध्या ‘पद्मावती’ सिनेमाबद्दल कितीही वाद सुरू असले तरी अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेवरुनही वाद सुरू आहेत. पण काहीही झाले तरी रणवीर मात्र ‘पद्मावती’मधील त्याच्या व्यक्तिरेखेची चर्चा होईल याची पूर्ण खबरदारी घेताना दिसतो. नुकताच त्याचा खिल्जीच्या लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो रेसलिंग हेवीवेट चॅम्पियन द मशीन टायटनने शेअर केला आहे. त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करताना म्हटले की, काल मी बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार रणवीर सिंगसोबत खूप चांगला वेळ घालवला. या दोघांचा एक व्हिडिओही सध्या खूप व्हायरल होत आहे. यात दोघांचेही लूक फार विचित्र दिसतं आहेत. रणवीरकडे पाहून त्याने ‘पद्मावती’तील खिल्जीचा लूक केला आहे हे लगेच समजते.

सध्या रणवीरच्या या व्यक्तिरेखेला फार विरोध केला जात आहे. ‘पद्मावती’ सिनेमाबद्दल दररोज नवनवीन विधानं येत आहेत. काही संघटनांकडून देशभरात या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गुरूवारी राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ता महिपाल मकराना यांनी शुर्पणखेप्रमाणे दीपिकाचे नाक कापू अशी धमकी दिली. ‘राजपूतांनी महिलांवर कधीही हात उगारला नाही पण गरज पडली तर लक्ष्मणाने शुर्पणखेचे जसे नाक कापले होते तसेच करणी सेना दीपिकासोबत करेल, अशी धमकी त्यांनी दिली’

तर करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कलवी यांनी पत्रकार परिषद घेऊन १ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले. ‘आम्ही लाखोंनी एकत्र येऊ. आमच्या पूर्वजांनी त्यांच्या रक्ताने इतिहास लिहिला आहे. त्यांच्या या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही १ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन करु.’ ते पुढे म्हणाले की, ‘सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी आम्ही चित्रपटगृहांच्या मालकांना आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने पत्र लिहू.’

पद्मावतीच्या या वादात जयपुर ब्राम्हण महासभाही सहभागी झाली आहे. संघटनेने सिनेमावर बंदी घालण्याचे रक्ताने स्वाक्षरी केलेले पत्र सेन्सॉर बोर्डाला दिले. दरम्यान, मेरठचे राजपूत नेता अभिषेक सोनने भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला पाच कोटी रुपये बक्षिस देण्याचे कबूल केले आहे.