बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. काही कलाकारांनी घराणेशाहीमुळे त्यांना आलेले अनुभव सांगितले तर काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले. तसेच सुशांतच्या चाहत्यांनी स्टारकिड्सवर आणि काही लोकप्रिय दिग्दर्शक-निर्मात्यांवर निशाणा साधला. विशेष करुन आलिया भट्ट आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वात जास्त ट्रोल करण्यात आले. आता आलियाने एका जुन्या मुलाखतीमध्ये घराणेशाहीवर केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आहे.

२०१९मध्ये आलियाने मुंबईमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात घराणेशाहीवर वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने तुम्ही एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलात म्हणून माफी मागू शकत नाही असे म्हटले आहे. तसेच ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे तिने म्हटले होते.

‘एखाद्या व्यक्तीला चांगल्या कुटुंबातील असल्यामुळे कामाची संधी मिळते असा विचार जर डोक्यात आला तर ते खूप भयंकर आहे. असा विचार करणाऱ्या लोकांना मी काही बोलू शकत नाही. खरं तर अशा गोष्टी अस्तित्वात नाहीत. मी एक दिवस अचानक उठून या कुटुंबात जन्माला आले म्हणून माफी नाही मागू शकत. पण मी हे नक्की म्हणू शकते की मी योग्य ठिकाणी आहे हे सिद्ध करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करेन’ असे आलिया म्हणाली होती.

सध्या घराणेशाही या वादावरुन आलिया ट्रोल केले जात आहे. त्यामुळे तिचे हे जुने वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. पण तिला स्टारकिड म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाइकचा पाऊस पाडला. प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये तो यूट्यूबवर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला. नेटकऱ्यांनी आलियावर निशाणा साधला होता.

आलियाने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने हायवे, उडता पंजाब, राझी, गली बॉय अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती लवकरच ‘सडक २’ चित्रपटात भूमिका साकारणार आहे. तसेच ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.