आलिया भट “सिर्फ नाम ही काफी है!” बॉलिवूडमध्ये झपाट्याने यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या आलिया भट विषयी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘उडता पंजाब’ पाठोपाठ अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील तिचा अभिनय आणि मोठ्या पडद्यावरचा तिचा सहज वावर पाहून चित्रपटरसिकांच्या मनात तिने घर केले आहे. चित्रपटात शाहरुख खानसारखा ‘मंजा हूआ’ अभिनेता समोर असतानादेखील तिने त्याच्या तोडीस तोड अभिनय करत प्रेक्षकांना अचंबित केले. आपण अभिनय करत असलेल्या चित्रपटातील भूमिका आत्मसात करून तिला योग्य न्याय देण्याचे कसब तिला फार थेड्या कालावधीत अवगत झाले आहे. यामुळेच सिनेरसिकदेखील तिच्या अभिनयावर आणि रुपेरी पडद्यावरील तिच्या छबीवर फिदा झाल्याचे अनुभवायला मिळते. दिवसागणिक तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसते.
‘उडता पंजाब’ चित्रपटात पीडित मुलीची भूमिका साकारल्यानंतर ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात तिने ‘मॉर्डन’ तरुणीची भूमिका साकारली. ही ‘मॉर्डन’ मुलगी तिने इतकी सहज वठवली की जणू काही ती अभिनय करत आहे असे भासलेच नाही. दैनंदिन वावरात कामाच्या ठिकाणी अथवा कॉलेजला जाणाऱ्या मुली ज्या सहजतेने समाजात वावरताना आढळून येतात इतका सहज अभिनय आलियाने चित्रपटातील ‘कायरा’चे पात्र साकारताना केला.
चित्रपटातील तिचा लूकदेखील अनेकांना भावला. तिचा हाच ‘मॉर्डन’ मुलीचा लूक घेऊन ‘फिल्मफेअर’ मासिकाने डिसेंबर आवृत्तीचे कव्हर साकारले आहे. मासिकाच्या कव्हरवरील तिचा लूक लोभसवाणा असून, स्मितहास्य करणाऱ्या आलियाच्या डोळ्यातील अल्लड भावदेखील पाहणाऱ्याचे मन मोहून टाकतात. मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘गर्ल-नेक्ट-डोअर’ अशी आपली छबी तयार करत आलिया सावध पावले टाकत आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसे अजिबात नसल्याचे अलिकडच्या तिच्या छायाचित्रांवरून जाणवते. तसेच फॅशन आणि स्टाईलची तिला किती छान जाण आहे हेदेखील दिसून येते.
अन्य एका मासिकाच्या कव्हर फोटोवर तिचा प्रगल्भ लूक पाहायला मिळतो. यावरून तिला साचेबंद व्यक्तिमत्वात अडकून राहायचे नही हे सिध्द होते. एका क्षणी ती अल्लड आणि खट्याळ दिसते, त्याचबरोबर प्रगल्भ आणि प्रतिभावंत स्त्री दर्शविण्यातदेखील ती कमी पडत नाही. ओठाला गडद तपकीरी लिप्स्टिक लावून या मासिकाच्या कव्हर इमेजसाठी साकारलेले रूप तिला एका धिरगंभीर स्त्रीचा लूक देतो. रोखून धरलेली नजर आणि चेहऱ्यावरील करारीपणा आत्मविश्वासाने भरलेल्या स्त्रीची अनुभुती देते.
यापूर्वी, सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोल्ड ड्रेस परिधान करून आलेली आलिया ग्लॅमरस दिसली होती. शॉर्ट गोल्डन ड्रेस, पायात गॉल्डन सॅण्डल्स परिधान केलेल्या आलियाचा पार्टी लूकदेखील तितकाच आकर्षक होता. अभिनयातील विविधता दर्शविणारी आलिया आपल्या दिसण्यातदेखील तितकीच वैविध्यता दर्शवत मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने वावरत आहे.
