|| रेश्मा राईकवार
तिला सध्या वाहिनीवर आपण लिटिल चॅम्प्सची सूत्रं सांभाळताना पाहतो आहोत, त्याआधी अभिनेत्री म्हणून तिची मालिका- चित्रपटांमधून झालेली घोडदौडही आपण अनुभवली आहे आणि तिचं दिग्दर्शकीय कौशल्यही तिने सिद्ध के लं आहे. आता ती अॅमेझॉन प्राइमवर ‘मुंबई डायरीज २६/११’ या हिंदी वेबमालिके तून लोकांसमोर येणार आहे. हा सगळा प्रवास एका वाक्यात सांगायचा तर ‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,’ असं हसत हसत मृण्मयी सांगते. एकाच वेळी मराठी- हिंदी चित्रपट, वेबमालिका सगळं काही करायची संधी आपल्याला मिळाली आहे, असं सांगणाऱ्या मृण्मयी देशपांडेने ‘मुंबई डायरीज २६/११’च्या चित्रीकरणाचे अनुभव, कोंकणा सेन शर्मा आणि मोहित रैनासारख्या कलाकारांबरोबर कामाचा अनुभव अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.
‘मुंबई डायरीज २६/११’चा विषय हा आजवर झालेल्या विषयांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या हल्ल्याच्या वेळी डॉक्टरांनी आपले प्राण पणाला लावून अनेकांचे प्राण वाचवले, त्यांच्या शौर्याची दखल या वेबमालिके तून घेण्यात आली आहे. या वेबमालिके त काम करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा मी निर्माता निखिल अडवाणींना भेटायला गेले होते त्यांच्या कार्यालयात… त्यांनी जेव्हा पटकथा ऐकवली तेव्हाच मी भारावून गेले होते, असं मृण्मयी सांगते. यात तिने सुजाता या डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘कलाकार नशीबवान असतात, त्यांच्या एका आयुष्यात त्यांना अनेक वेगवेगळे आयुष्य साकारायची संधी मिळते. त्यातलं एक आयुष्य जर २६-११ ची परिस्थिती यशस्वीपणे हाताळणाऱ्या डॉक्टरांचं असेल तर याहून मोठं काय असू शकतं. त्या भयानक परिस्थितीत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. त्यांनी त्यांचा मानवतेचा धर्म पाळला. त्यामुळे सुजाताची भूमिका करायला मिळाली याचा मला खूप आनंद झाला,’ असं ती सांगते.
या कथेचा आवाका पाहता त्यासाठीची तयारी नेमकी कशी होती हे सांगताना सुजाताच्या भूमिके त दोन ओळींच्या मध्ये दडलेलं असं खूप काही आहे. ती संवाद कमी बोलते, नजरेतून खूप व्यक्त होते. या भूमिके साठी तयारीही खूप करावी लागली, कारण एका व्यावसायिक डॉक्टरची भूमिका साकारायची होती. त्यांचं बोलणं, त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणारे शब्द, के ल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रक्रिया यांची माहिती असणं खूप गरजेचं होतं. लोकांना ही भूमिका योग्य आणि खरी वाटावी, त्यांचा विश्वास बसावा यासाठी अभ्यास खूप के ला, असं ती म्हणते. मात्र त्याच वेळी भूमिके साठी भावनिक तयारी फारशी करावी लागली नाही, असं तिने स्पष्ट के लं. एका रात्रीत घडणाऱ्या या गोष्टीचं चाळीस दिवस चित्रीकरण करताना दिग्दर्शकाने त्यासाठीची योग्य वातावरणनिर्मिती, सेट्स, कलाकारांची निवड हे सगळं उत्तम जमवून आणलं होतं, अशी माहिती तिने दिली.
या वेबमालिके च्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच कोंकणा सेन शर्मा, मोहित रैनासारख्या नावाजलेल्या हिंदी कलाकारांबरोबर काम के लं आहे. हे कलाकार म्हणून समोर येतच नाहीत. ते तुम्हाला पहिल्यांदा माणूस म्हणून भेटतात आणि तीच त्यांची खरी खासियत आहे. म्हणजे त्यांच्याभोवतालचं स्टार वलय दिसत नाही, पण ते असतं… यालाच स्टारडम म्हणतात. ते उत्तम नट आहेत. त्यामुळे खरं काम तर त्यांनीच के लं आहे. त्यांच्या क्रि येला प्रतिक्रिया देणं हेच माझं काम होतं, असं सांगणाऱ्या मृण्मयीने यानिमित्ताने मराठीतील पुष्कराज चिरपुटकर, संदेश कु लकर्णी, अक्षर कोठारीसारख्या उत्तम कलाकारांबरोबरही काम करता आल्याबद्दल आनंद व्यक्त के ला. कलाकारांची एवढी तगडी फळी, तेवढ्याच ताकदीची पटकथा, उत्तम सेट्स आणि इतका संवेदनशील – हळवा विषय… या सगळ्याची फोडणी दिल्यावर अनुभव सुंदरच असतो. ‘मुंबई डायरीज’मधून तो अनुभव मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त के ला.
या वेबमालिके च्या चित्रीकरणाचा प्रत्येक दिवस मला आठवतो, असं सांगणाऱ्या मृण्मयीने चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आम्ही सेटवर आलो की पहिल्यांदा मळायचो. आमच्या अंगावर आणि कपड्यावर माती लागायची, रक्त लागायचं. नंतर सेटवर खोटे मृतदेह असायचे, आमच्या आजूबाजूला जखमी लोक, सिमेंट-धूळ-माती, बांबू पडलेले असायचे, कु ठे लस पडली आहे. या सगळ्या वातावरणात चित्रीकरण सुरू असताना बंदुकीच्या फै रींचे आवाज, बॉम्बस्फोटाचा आवाज आम्हाला ऐकू यायचा. हे सगळं त्या क्षणी तरी आमच्यासाठी खरं होतं. अॅक्शन आणि कट या दोन शब्दांदरम्यान आमच्या डोळ्यासमोर हे सगळं खरंखुरं घडत असायचं. त्यामुळे एका अर्थी वेदनादायी असं हे चित्रीकरण, पण खूप चांगल्या अर्थाने आजही ते मला चांगलं आठवतं आहे.’
करोनाने कलाकार म्हणून आयुष्य बदललं म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला, असं ती सांगते. कलाकार, इंजिनीअर, डॉक्टर ही आवरणं करोनाने काढून टाकली. प्रत्येक जण माणूस म्हणून समोर आला. या महामारीला आपण मानवतेच्या पातळीवरून सामोरं जातो आहे. प्रत्येकाने आपली माणसं या काळात गमावली आहेत. त्यामुळे एक समाज म्हणून संकटांना सामोरं जाणं, विकासासाठी प्रयत्न करणं आणि विकास म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेणं या सगळ्याची जाणीव करोनाने करून दिली आहे, असं ती म्हणते. आयुष्याची ही प्रश्नपत्रिका ज्यांनी उत्तम हाताळली त्यांना त्यांच्या आयुष्यात चांगले गुण मिळतील, असा विश्वास व्यक्त करतानाच कलाकार म्हणून कामाचा अनुभव फार वेगळा नाही. एकदा तुम्ही भूमिके त शिरलात की भवताल विसरायला होतं, ते तेव्हाही होतं आणि आजही होतं आहे, असं तिने स्पष्ट के लं. बाकी एकमेकांना हस्तांदोलन करता येत नाही. अंतरनियम पाळावे लागतात, मुखपट्टी वापरावी लागते, पण कॅ मेऱ्यासमोर आल्यानंतर मुखपट्टी न वापरता काम करावं लागतं. करोनाचे जे नियम आहेत ते सगळ्यांनीच काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असं आवाहनही तिने चाहत्यांना के लं.
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून विषयांची निवड करताना तिचे निकष काय असतात, याबद्दल बोलताना दिग्दर्शन मी पैशासाठी करत नाही, तो माझा आनंद आहे, असं ती सांगते. माझा आता दुसरा चित्रपटही तयार आहे. दिग्दर्शक म्हणून काम करताना काळाच्या बरोबर जाणारा तुमचा चित्रपट असला पाहिजे. बदलत जाणाऱ्या काळाचे पडघम तुमच्या चित्राकृतीत असले पाहिजेत, असा आग्रह ती धरते, तर अभिनेत्री म्हणून काम निवडताना ते आपल्याला आवडलं असलं पाहिजे आणि पहिले के लेल्या कामापेक्षा वेगळं असलं पाहिजे हेच निकष असतात. फार वेगळा विचार त्यामागे करत नसल्याचं तिने सांगितलं. कोणत्याही दिग्दर्शकाला पटकथेवर खूप काम करावंच लागतं. ‘मुंबई डायरीज’च्या पटकथेवरही दोन वर्षे काम सुरू होतं. त्यामुळे तुमचा आत्मा आणि जीव ओतून काम के लं तर ती कलाकृती चांगली होऊ शकते. हाच अनुभव मी ‘मुंबई डायरीज’च्या सेटवरही घेतला, असं ती सांगते. ओटीटीमुळे मराठी आणि हिंदीतले चांगले कलाकार एकत्र येऊन काम करत असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगतानाच या वेबमालिकांमुळे आपल्याकडची गुणवत्ता जगभरात पोहोचते आहे हे तिला महत्त्वाचं वाटत असल्याचंही तिने सांगितलं. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई डायरीज २६/११’ या वेबमालिके ला गणरायाचा आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम मिळो, अशा सदिच्छा व्यक्त करत तिने या गप्पांचा समारोप के ला.
सिनेमा आणि मालिके तील दरी भरून काढायचं काम ओटीटीने के लं आहे. सात ते आठ भागांमध्ये तुम्हाला तुमचे विषय वेबमालिके तून सविस्तर मांडता येतात. अनेकदा मालिका वाढवण्यासाठी त्यात पाणी घालून त्या मोठ्या के ल्या जातात. तर चित्रपटात अनेकदा काही विषय मांडताना ते तुकड्यातुकड्यांत मांडले आहेत असं वाटत राहतं. अधिक विस्ताराने मांडण्याची गरज वाटते. अशा वेळी तुमच्या विषयाला न्याय देण्यासाठीचा उपाय म्हणजे ओटीटी. तुम्ही योग्य पद्धतीने तुमचे विषय लोकांपर्यंत वेबमालिके तून पोहोचवू शकता आणि प्रेक्षकही ते त्यांच्या सोयीने पाहू शकतात.
मृण्मयी देशपांडे