रवींद्र पाथरे

सत्तर-ऐंशीच्या दशकापासून भारतीय तरुणाई आधी शिक्षणासाठी परदेशात गेली आणि नंतर उच्च शिक्षणाबरोबरीनेच नोकरी-उद्याेग-व्यवसायासाठीही इंग्लंड-अमेरिकेत बहुतेक जण स्थलांतरित व्हायला लागले. आज हे प्रमाण प्रचंडच वाढलंय. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन तिथेच मग आपले पायही रोवले. अथक मेहनतीने त्या देशांत, तिथल्या समाजात त्यांनी काहीएक स्थानही मिळवलंय. पण त्यांचं मन मात्र भारतीय मातीचंच बनलेलं असल्याने ते शरीरानं जरी तिथे वास्तव्य करीत असले तरी मनानं इथल्या आपल्या नात्यागोत्यांत, संस्कृती-परंपरांत अडकलेलेच राहिले. साहजिकपणेच भारतीय संस्कृती, इथली मूल्यं, रीतीभाती, परंपरा तिथेही जपण्याचा त्यांनी जिवापाड प्रयत्न केला… अजूनही करत असतात. (विशेषत: २०१४ नंतर तर ही मंडळी कट्टरपंथी झाल्याचंही दिसून येतं. मात्र, सुखासीन अमेरिका सोडून काही ती मंडळी इथे मायदेशात परतत नाहीत.) मात्र त्यांची पुढची पिढी तिथेच जन्माला येऊन तिथेच लहानाची मोठी झाल्याने स्वाभाविकपणेच ती अमेरिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे. तिथली संस्कृती, तिथली मूल्यं त्यांना आपली वाटतात. तो त्यांचा जगण्याचा एक हिस्सा बनलाय. आणि ते नैसर्गिकदेखील आहे. त्यांना आपल्या आई-वडिलांच्या मातीशी, तिथल्या नात्यागोत्यांशी काही भावनिक, मानसिक, व्यावहारिक संबंध राखणं अवघड वाटत असेल तर त्यात मुळीच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. परंतु त्यांच्या पालकांना मात्र त्यांनी आपल्या मुळांशी जोडलेलं राहावं असं वाटत असतं. परंतु ते तितकंच कठीण आहे. जी कधी पाहिलेलीच नाही, अनुभवलेली नाही, अशा संस्कृतीचा आपण एक भाग आहोत, हे त्यांना कसं काय पचणार? रुचणार? साहजिकपणेच वडील पिढीशी त्यांचे मतभेद, ताणतणाव निर्माण होणार, हे ओघानं आलंच. नुकतंच रंगभूमीवर आलेलं राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित (नेपथ्य/ संगीत/ वेशभूषा/ प्रकाशयोजना… सब कुछ पुरुषोत्तम बेर्डेच!) ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक या दोन पिढ्यांतील संघर्षावर आधारित आहे.

mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
Fujiyama EV Classic launched
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल; ११० किमी रेंज, बुकींगही सुरु, किंमत फक्त…

हेही वाचा >>> लापता लेडीज भन्नाट

हरीहर हा अमेरिकेत स्थलांतरित झालेला आणि तिथे व्यवसायात प्रचंड यशस्वी झालेला गृहस्थ. त्याने कोकणातील नीलिमाशी लगभन केलंय. पण ती तिथे गेल्यावर मात्र पूर्णपणे ‘अमेरिकन’ झालीय. त्यांना एक मुलगी आहे… हनी ऊर्फ बबलू. हरी आपल्या भारतातल्या कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या कायम निकट राहिलेला आहे. त्याचा मेव्हणा निशिगंध हाही सुरुवातीला हरीकडे नोकरी करत असतो. हळूहळू तो त्या व्यवसायात इतका पारंगत होतो, की हरी त्याला आपल्या व्यवसायात संचालक आणि भागीदारही करून घेतो. पण हनी मात्र अमेरिकन संस्कृतीत वाढल्याने व्यावहारिक आणि स्व-तंत्र विचारांची म्हणून घडते. तिचे हरीचे भारतातले आई-वडील, भाऊ-भावजय यांच्याशी काहीएक संबंध न आल्याने तिला त्यांच्याबद्दल कसलीही जवळीक वाटत नाही. नीलिमाही आता अमेरिकन संस्कृतीतच मुरल्यामुळे तीही हरीच्या या भावनिक गुंतणुकीशी फारशी सहमत नसते. साहजिकच हरी, नीलिमा आणि हनी यांच्यातले संबंध कायम ताणलेलेच असतात. हनीची जी थोडीफार भावनिक गुंतणूक असते ती मामा निशीशी आणि त्याची मैत्रीण मार्गारेटशी. तिचं हे वर्तन हरीला मान्य नसतं. तिच्या मित्रमंडळींशी झालेल्या वादातून, एकटेपणातून ती सैरभैर होते. मानसिकदृष्ट्या खचते. निशी तिला नेहमी आधार देतो. त्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडते. त्याच्याशी लगभन करू इच्छिते. हरी-नीलिमासाठी हनीचा हा निर्णय म्हणजे भयंकर बॉम्बस्फोटच असतो.

त्यातून ते कसे बाहेर पडतात, निशीचं याबाबतीत काय म्हणणं असतं, हनी आपल्या या निर्णयापासून परावृत्त होते का, वगैरे गोष्टी प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य ठरेल.

हरीच्या आयुष्यातील हा तिढा कशामुळे निर्माण झाला? तोही याला काही अंशी कारणीभूत आहे का? की अमेरिकन संस्कृतीमुळे निर्माण झालेला हा गुंता आहे? नीलिमाचे संस्कार यात कितपत जबाबदार आहेत? हनी निशीच्या प्रेमात पडायला काय कारण घडलं?… असे अनेक प्रश्न या नाटकात उद्भवतात आणि त्यांची उत्तरंही यथाकाल मिळत जातात. परदेशी स्थलांतरितांच्या पहिल्या काही पिढ्यांतील हा प्रश्न आहे, संघर्ष आहे. तो यथावकाश निवळेलही. पण सध्यातरी हा तिथल्या स्थलांतरितांसमोरचा ज्वलंत प्रश्न आहे, हे नक्की. त्याकडे भारतीय चष्म्यातून पाहणं योग्य ठरणार नाही. व्यापकपणे तो समजून घ्यावा लागेल आणि त्याची उत्तरंही तार्किकरीत्या उमजून घ्यावी लागतील. लेखक राजन मोहाडीकर यांनी भारतीय चष्म्यातूनच तो मांडला आहे आणि त्याचं उत्तरही इथल्याच चष्म्यातून दिलं आहे. ते तात्पुरतं आहे, आणि असेल. त्याने मूळ प्रश्न कदापि सुटणं अवघड आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी संहितेबरहुकूम नाटकाला यथोचित न्याय दिला आहे. व्यक्तिरेखाटन, त्यांच्यातले ताणतणाव, परस्परांतील गुंतलेपण यांचा गोफ त्यांनी छान विणला आहे. तिथपर्यंतचा सगळ्या पात्रांचा प्रवासही त्यांनी वास्तवदर्शी केला आहे. मात्र, तिथली ‘संवाद’ मासिकाची संपादक मेघा फडणवीस हा याला अपवाद आहे. तिचं अर्कचित्रात्मक चित्रण मूळ नाटकात ठिगळासारखं जोडलेलं वाटतं. अमेरिकन आणि भारतीय संस्कृतीतील दुवा म्हणून जरी तिचा वापर केलेला असला, तरी तो एकूण नाटकाच्या प्रकृतीशी मेळ खात नाही. बाकी सगळी पात्रं बेतशीर, आपल्या जागी योग्य आहेत. स्थलांतरित भारतीयांचे प्रश्न आणि त्यांच्यापुढच्या समस्यांना हात घालणारं हे नाटक त्यातले पेच आणि तिढ्यांसह आपल्यासमोर येतं. परंतु त्यांची उत्तरं मात्र भारतीय परिप्रेक्ष्यात आपल्याला मिळतात. अर्थात ती तिथल्या सामाजिक वातावरणाशी सुसंगत व उचित असतीलच असं नाही. हे गुंते नाटकात दाखवल्यापेक्षा अधिकच व्यामिश्र असणार, हे निश्चित. ते तिथल्या लेखकांनीच अनुभवांती मांडणं उचित ठरावं. असो. पुरुषोत्तम बेर्डे यांनी नेपथ्य, संगीत, वेशभूषा आणि प्रकाशयोजना अशा चतुरस्रा जबाबदाऱ्या या नाटकात सांभाळल्या आहेत. त्यांचाही विशिष्ट परिणाम नाटकात जाणवतो.

हेही वाचा >>> ही अनोखी गाठ सोपी सुटसुटीत… !

या नाटकात हरीहरची दुभंग भूमिका दीपक करंजीकर यांनी एकाच वेळी ठाशीवपणे आणि तितकीच भावनिकदृष्ट्या संवेदनशीलतेनं आकारली आहे. एक कर्तृत्ववान, आपण कष्टाने कमावलेल्या अधिकाराचा आत्मविश्वास असलेला ठाम उद्याोजक आणि त्याचवेळी आपल्या मायभूमीतील गोतावळ्यात भावनिक आणि मानसिकदृष्ट्या गुंतलेल्या हरीहरची ही दोन भिन्न रूपं त्यांनी तितक्याच सशक्तपणे अभिव्यक्त केली आहेत. अमेरिकन संस्कृती बहुतांशी अंगीकारलेल्या, पण सारंच भारतीयपण न हरवलेल्या नीलिमाची भूमिका भाग्यश्री देसाई यांनी पुरेशा गंभीरपणे निभावली आहे. अमेरिकन संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या, त्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या आणि आपल्या उक्ती-कृतीत ती उतरवणाऱ्या हनीचं हरवलेपण, तिची मानसिक दोलायमान अवस्था अमृता पटवर्धन यांनी अमेरिकन शब्दोच्चारांसह तिच्या वागण्या-वावरण्यातून, बोलण्यातून पुरेपूर पोहोचवली आहे. निशिगंध आपटेची प्रेमळ, समंजस, हुशार आणि व्यवहार व भावनांचा ताळमेळ राखणारी व्यक्तिरेखा आशुतोष नेर्लेकर यांनी सहज साकारली आहे. मोनिका जोशी यांची मेघा फडणवीस अर्कचित्रात्मक, अतिशयोक्तीकडे झुकलेली आहे. एकुणात, स्थलांतरितांच्या समस्येला हात घालणारं आणि त्यावर भारतीय परिप्रेक्ष्यात उत्तरं शोधणारं हे नाटक इथल्या एतद्देशीय प्रेक्षकांना आवडायला हरकत नाही.