रेश्मा राईकवार

‘ही अनोखी गाठ’ हे शब्द जरी कानावर पडले वा डोळ्यांसमोर आले तरी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याच ‘पांघरूण’ चित्रपटातील हे गाणं ओठांवर रुंजी घालू लागतं. एरवी सहजी एकत्र आले नसते असे दोन जीव एका नात्यात बांधले जातात तेव्हा त्या नात्याचं काय होतं? ते हळूहळू खुलत जातं का? तो दोघांना एकत्र आणणारा नेमका क्षण कुठला? त्या नात्यात एकाचा आनंद आणि दुसऱ्याची फरफट असेल तर… प्रेमाची गोष्ट कितीही सारखी वाटली तरी प्रत्येकवेळी समोर येताना ती नवा काहीतरी पैलू घेऊन येते त्यामुळे नव्या काळातील तरुणाईची अशा नात्यातील भूमिका काय असेल? याची उत्सुकता ‘ही अनोखी गाठ’ बाबत होती. तुलनेने काळ नवा आहे, निर्णयाचं स्वातंत्र्यही आहे, त्यामुळे असेल बहुधा पण ही गोष्ट मांजरेकरांच्या आधीच्या चित्रपटापेक्षा बरीच सोपी आणि सुटसुटीत वाटते.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
aai kuthe kay karte fame akshaya gurav reveals her bad patch
“अचानक मालिकेतून काढलं अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “मी खचले…”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

‘ही अनोखी गाठ’ पाहताना नकळतपणे ‘पांघरूण’ची आठवण होत राहते. कारण दोन्ही चित्रपटांत अशाच अवघड, अनवट नात्याची गोष्ट आहे. त्यातल्या प्रेमाची गुंतागुंत आहे. केवळ काळाचे संदर्भ बदललेले आहेत. त्यामुळे काळानुरूप मुळात लोकांच्या मानसिकतेतही झालेला बदल, प्रेमविवाहाला असलेल्या विरोधाची कमी झालेली धार, कितीही गुंतागुंत झाली तरी त्यातून बाहेर पडण्याची तरुण पिढीची मानसिकता अशा कितीतरी मूलभूत गोष्टींमुळे ‘ही अनोखी गाठ’ पाहताना ती बरीचशी हलकीफुलकी सुखांतिका अधिक वाटते. आयुष्य उत्फुल्लपणे जगणारी अमला (गौरी इंगवले) ही या चित्रपटाची नायिका आहे. वाई-पाचगणीसारख्या निसर्गसुंदर वातावरणात राहणारी अमला, नृत्यात निपुण आहे. अमलाचे वडील कडक शिस्तीचे, एका चौकटीत वागणारे तर नियमांची कुठलीही चौकट न मानता मनमुक्त जगणारी अमला यांच्या नात्यात काहीसा तणाव आहे. तरीही जमेल तसं बंड करत अमला आपल्याला हवं तसं जगण्याचा प्रयत्न करू पाहते. अमलाच्या इच्छेविरुद्ध तिचे वडील तिचं लग्न तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या श्रीनिवासशी लावून देतात. आता लग्नाची गाठ म्हणून आलेलं हे नातं होईल तसं निभवायचं या विचारात असलेल्या अमलाला समजूतदार श्रीकडून तिला हवं तसं जगण्याची संधी मिळते. या संधीमुळे अमला आणि श्री एकमेकांना कायमचे दुरावतात का? अमलाच्या वडिलांचं काय होतं? अमलाला अपेक्षित असा जोडीदार मिळतो का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरातून या अनोख्या नात्याची गोष्ट खुलवत नेण्याचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केला आहे.

हेही वाचा >>> ‘हे वर्ष चित्रपटांचं…’

या चित्रपटातील प्रेमाची गोष्ट अजिबात नवीन नाही. या चित्रपटाचं वैशिष्ट्य हे त्याच्या कथेपेक्षा त्याच्या व्यक्तिरेखांमध्ये आहे असं म्हणता येईल. अमला ही मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिच्यावर आई-वडिलांनी केलेल्या मध्यवर्गीय संस्कारांचा पगडाही आहे. बहिणीसारखी अभ्यासात हुशार नसेल, पण खेळात आणि कलेत निपुण आहे. कलेच्या जोरावर आपण वेगळं काहीतरी करू शकतो हा तिचा विश्वास आहे. ते करताना कुठेही आपल्या तत्त्वांचा, संस्कारांचा विसर आपल्याला पडणार नाही हेही ती वेळोवेळी वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अमलाचे वडीलही वाईट वा अतिरेकी विचारांचे नाहीत. अमलावरच्या विश्वासापेक्षा तिच्या या बंडखोर स्वभावामुळे तिचं पाऊल वाकडं पडू नये ही वडिलांची भीती अधिक वरचढ ठरते आणि ते तिचा विचार न घेता निर्णय घेऊन मोकळे होतात. हे एक टोक आहे तर श्री मुळात समजूतदार आहे. समोरच्याचं मन जपणारा, त्याचा अवकाश जपणारा, चांगलंच विचार करणारा थोडक्यात आदर्शवादी आहे. श्रीची आईही तितकीच समजूतदार, अमलाचं मन न सांगता अचूक जाणणारी आहे. ज्यामुळे या नात्यात काहीएक नाट्य उभं राहू शकलं असतं अशा दोन व्यक्तिरेखाच आदर्शवादी असल्याने अमला आणि श्रीच्या नात्याची गोष्ट अपेक्षित वळणाने पुढे जाते. त्यात नाट्य वा नवंपण काही नाही. मात्र नव्या पिढीच्या मानसिकतेचा पुरेपूर विचार मांजरेकर यांनी अमलाच्या व्यक्तिरेखेत केलेला दिसतो. अनेकदा उत्तम काय हे दिसतं, ज्याच्यावर आपण प्रेम करतो आहोत ती व्यक्ती नात्याबाबत पुरेशी गंभीर नाही हे कित्येक प्रसंगातून दिसत राहतं. तरीही प्रेमातील आंधळेपणानं वा जात्याच समजूतदार असल्याने त्याकडे कानाडोळा करत ते नातं पुढे रेटण्याचा प्रयत्न मुलींकडून होत राहतो. काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न न करता केवळ अमलाच्या वागण्या-बोलण्यातून आजच्या मुलींनी स्वत:च्या निर्णयाबाबत ठाम राहताना प्रेमाचं नातंही चौकसपणे स्वीकारायला हवं हे त्यांनी सहजपणे दाखवून दिलं आहे.

हेही वाचा >>> मामाच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानींच्या जुळ्यांचा मोहक अंदाज, आईबरोबरच्या फोटोंनी वेधलं लक्ष

मात्र ही श्री आणि अमला दोघांची, त्यांच्या प्रेमाची गोष्ट आहे. त्यांच्या दोघांमधील भावनाट्याचं चित्रण महत्त्वाचं होतं. इथे मात्र त्याची कमी जाणवत राहते. श्रीच्या भूमिकेत अभिनेता श्रेयस तळपदेला पाहणं हा त्याच्या चाहत्यांसाठी सुखद अनुभव आहे. गौरी इंगवलेनेही अमलाची भूमिका समजून उमजून केली आहे. दोघेही कलाकार उत्तम ताकदीचे असूनही त्यांच्यातील नात्याचं गहिरंपण इथे अनुभवायला मिळत नाही. कथा वाई-पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात घडते. इतकं सुंदर वातावरण असूनही करण रावत यांच्या छायाचित्रणातून ते अधिक बोलकं होत नाही. त्या तुलनेत श्रीचं घर आणि त्या घरातले प्रसंग अधिक उठावदारपणे चित्रित झाले आहेत. भावगर्भ कथेला अनेकदा श्रवणीय गाण्यांची अर्थपूर्ण साथ अधिक उपयोगी ठरते. इथे तोही भाग तोकडा पडला आहे. त्यामुळे अतिशय सोपी आणि सुटसुटीत सुखांतिका यापलीकडे ही गाठ आपल्याला गुंतवून ठेवत नाही. ती तशी असायला हवी होती हे मात्र वाटत राहतं.

दिग्दर्शक – महेश मांजरेकर कलाकार – गौरी इंगवले, श्रेयस तळपदे, सुहास जोशी, शरद पोंक्षे, ऋषी सक्सेना.