VIDEO: अमेय-मिथिलाच्या ‘मुरांबा’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘टिझर बघा, वाटा, आवडून घ्या’

मुरांबा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि वेब सीरिजच्या विश्वात चर्चेत असणऱ्या मिथिला पालकर आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मुरांबा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेय आणि मिथिला या दोघांनीही त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा टिझर शेअर केला आहे. ‘मुरांबा’ या चित्रपटाच्या निमित्ताने इंदु आणि आलोकच्या भूमिकेत हे दोन्ही नव्या जोमाचे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत.

२ जूनला ‘मुरांबा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, अमेय आणि मिथिलाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. चित्रपटाचा टिझर पाहता बऱ्याच जोड्यांमध्ये उडणारे खटके आणि काही कारणास्तव त्यांच्यामध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकींची हलकीशी झलक या टिझरमधून पाहायला मिळत आहे. ‘काहीतरी सांगण्यासाठी आलोकचे शब्द फुटणार तोच… दोन मिनिटं थांबणार आहेस का?’, असा खोचक प्रश्न करणारी इंदु पाहिली की अनेकांनाच असा प्रसंग कधीतरी आपल्यासोबतही घडला होता याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. चित्रपटाच्या टिझरमधून फार काही तर्क लावता येत नसल्यामुळे ‘मुरांबा’चे कथानक प्रेक्षकांना नेमके कोणत्या सफरीवर नेणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अमेयने टिझर शेअर करत त्याला ‘टिझर बघा, वाटा, आवडून घ्या’ असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच वरुण नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित या ‘मुरांबा’चे पोस्टर लाँच करण्यात आले होते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमेय आणि मिथिला एका सोफ्यावर उलटे झोपलेले दिसले होते. त्यासोबतच त्यांचा फ्रेश लूकही अनेकांच्या पसंतीस उतरतला. त्यामुळे वेब सीरिजच्या माध्यमातून चर्चेत असणारी ही सोशल जोडी चित्रपटातून प्रेक्षकांची वाहवा मिळवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amey wagh mithila palkar upcoming movie muramba movie new teaser launch