बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या मागे धावणारे चाहते आपण आजवर अनेकदा पाहिले असतील पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चक्क एका वाघाने ‘बिग बीं’चा पाठलाग केला. धक्का बसला ना..पण हो हे खरं आहे. खुद्द अमिताभ यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वाघाच्या पाठलागाचे फोटो शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचं झालं असं की, वन्यजीव आठवड्याच्या निमित्ताने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अर्थात मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये एक खास जंगल सफारी आयोजित करण्यात आली होती. अमिताभ बच्चन हे ‘वाघ वाचवा’ मोहिमेचे व्याघ्रदूत असल्याने त्यांना या जंगल सफारीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेतेही यावेळी उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन आणि इतर मंडळी सफर करीत असलेल्या बसचा एका पट्टेदार वाघाने तब्बल ४ किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. व्याघ्रदर्शनाच्या अनुभवाने ‘बिग बी’ भलतेच खुश झाले आणि वाघ पाठलाग करीत असल्याची छायाचित्रे टिपून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

उद्देश सफल झाला तरच व्याघ्रदूत म्हणून माझी झालेली निवड योग्य ठरेल असे मी मानतो. जर माझा आवाज किंवा माझा चेहरा या उपक्रमाला खरचं फायदेशीर असेल तर अशा उपक्रमासाठी मी केव्हाही तत्पर असेन, असे अमिताभ म्हणाले.
गेली ६५ वर्षे मी मुंबईत आहे पण, या जंगल सफारीने मी कधीच न पाहिलेल्या दृश्यांचे दर्शन झाले. एकेकाळी वाघांची संख्या ४०,००० इतकी होती ती २००८ पर्यंत १४११ इतकी खाली आली. त्यानंतर सुरू झालेल्या ‘वाघ वाचवा’  मोहिमेच्या माध्यमातून वर्षभरात वाघांची संख्या २२२६ इतकी झाली. हे या मोहिमेचे यश म्हणता येईल पण, ती आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही अमिताभ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan tweets about being chased by a tiger for four kms
First published on: 07-10-2015 at 13:12 IST