विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काल २६ डिसेंबरला मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनमध्ये क्रिकेट तसेच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या स्टार कपलच्या आनंदात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चनही आले होते. अमिताभ यांच्यासोबत त्यांची मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही उपस्थिती लावली होती.

अमिताभ यांनी वेळात वेळ काढून रिसेप्शनला हजेरी लावली या गोष्टीने अनुष्का एवढी खुश झाली की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. अनुष्काने हात जोडून महानायकाचे स्वागत केले. बिग बी यांच्या हाताला दुखापत झाली होती. तरीही त्यांनी या रिसेप्शनला आवर्जुन उपस्थिती लावली होती

अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी विराट आणि अनुष्काला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मुलीसोबत रिसेप्शनला गेल्याचे नमूद केले. तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची आवर्जुन भेट घेतल्याचे म्हटले आहे. आपल्या तीनही ट्विटवरुन त्यांनी चाहत्यांसाठी रिसेप्शनमधील फोटो शेअर केले आहेत.

एकीकडे विराट शांत उभा राहून अनुष्का आणि बिग बी यांच्यातील बॉण्डिंग पाहत होता तर दुसरीकडे अमिताभ आणि अनुष्का एकमेकांना हात जोडून अभिवादन करत असलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. या लग्नाला मोजून ४४ लोकच उपस्थित होती. लग्नानंतर ‘विरुष्का’ने दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये पहिले रिसेप्शन दिले. तर मुंबईत २६ डिसेंबरला दुसरे रिसेप्शन दिले.