‘नच बलिये-७’च्या पर्वाची विजेती आणि ‘नटरंग’मधील ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’या गाण्यावर पदन्यास केलेली मराठमोठी अमृता खानविलकर आता ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे.
या शनिवारी सादर होणाऱ्या ‘झलक दिखला जा’च्या कार्यक्रमात अमृताचा ‘गेस्ट अॅपिअरन्स’ म्हणून प्रवेश होणार असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अमृताच्या नृत्याची अदाकारी पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटातील अभिनेत्री व नृत्यांगना अशी ओळख असलेल्या अमृताने ‘नच बलिये-७’चे पर्व जिंकले आणि अमराठी प्रेक्षकांमध्येही आपली ओळख निर्माण केली. नृत्यावर आधारित असलेल्या ‘रिअॅलिटी शो’मधून तसेच विविध पुरस्कार सोहोळ्यात अमृताच्या नृत्याची झलक या अगोदर पाहायला मिळाली आहे.
‘नच बलिये-७’मध्ये तीने स्वत:च्या नृत्यावर मेहनत घेतलीच पण तिच्या नवऱ्याची हिमांशुचीही ती नृत्यशिक्षिका झाली होती. आता ‘झलक दिखला जा’मधून ती नेहा मर्दा व नृत्यदिग्दर्शक रजित यांच्याबरोबर नृत्य करताना दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या ‘तीन तडका’ या संकल्पनेवरील कार्यक्रमात हे तिघेही ‘रा वन’ चित्रपटातील ‘बेहेने दे’ या गाण्यावर नृत्य करणार आहेत. या तिघांचीही नृत्यशैली वेगळी असून त्यामुळे प्रेक्षकांना तीन वेगवेगळ्या प्रकारची नृत्यशैली एकाच कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. ‘झलक दिखला जा’मध्ये ‘सेलिब्रेटी गेस्ट’ म्हणून खास आमंत्रित केल्याबद्दल अमृता खुषीत आहे. अमृताचे ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वन वे तिकिट’, ‘ऑटोग्राफ’ हे आगामी चित्रपट असून लवकरच ते प्रदर्शित होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘झलक दिखला जा’मध्ये अमृता खानविलकर खास पाहुणी कलाकार
‘नच बलिये-७’च्या पर्वाची विजेती आणि ‘नटरंग’मधील ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’या गाण्यावर पदन्यास
Written by रोहित धामणस्कर

First published on: 30-09-2015 at 08:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar to attend jhalak dikhla jaa as judge