तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?
जगण्याच्या क्षणाक्षणांत आनंद कोण भरते?
कोण लिहिते कविता आणि कोण रचते गीत?
कुणाच्या सुरांशी आपली जुळून जाते प्रीत?
कोण आणते हसू ओठी, आनंदाश्रू नेत्री?
ते सारे जे आम्हा लाभले दिग्गज आनंदयात्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:चे आणि इतरांचे आयुष्य आनंदाने भरुन टाकणाऱ्या आणि शब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम म्हणजे ‘आनंदयात्री’. स्टार प्रवाह प्रस्तुत ‘आनंदयात्री’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच ग. दि. माडगूळकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार आहे. १८ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता स्टार प्रवाहवर शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भावगीत असो, एखादी लावणी किंवा समरगीत ग. दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. कवी, गीतकार, लेखक, कथा पटकथा संवाद लेखक, नाटककार, अभिनेता अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या गदिमा यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राला समृद्ध केलं. गदिमा यांच्या याच समृद्ध कलेचा ठेवा ‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत ‘आनंदयात्री’ पुष्प तिसरे या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडण्यात येणार आहे.

या खास कार्यक्रमात प्रसेनजित कोसंबी, जान्हवी प्रभू अरोरा, शरयू दाते, ऋषिकेश कामेरकर, प्रथमेश लघाटे, सुचित्रा भागवत आणि निलाक्षी पेंढारकर या सुप्रसिद्ध गायकांनी गदिमांची निवडक गाणी सादर करत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकलं. गदिमा यांच्या बाई ‘मी पतंग उडवित होते…’ या लावणीवर अभिनेत्री आणि नृत्यांगना तन्वी पालव आणि सुकन्या काळण या दोघींनी ठेका धरत आनंदयात्रीची मैफल संस्मरणीय केली. स्पृहा जोशीच्या दिमाखदार सुत्रसंचालनाने या कार्यक्रमात अनोखे रंग भरले आहेत. या अनोख्या सोहळ्यात आनंद माडगुळकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, आणि सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आनंदयात्री हा फक्त कार्यक्रम नसून ती एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा ‘स्टार प्रवाह’चा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्ताने मानवंदना देण्यात येत आहे. शब्द-सुरांच्या या मैफलीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवली आहे. श्रीधर फडके आणि पु. ल. देशपांडे विशेष आनंदयात्री कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या भरघोस प्रतिसादानंतर ग. दि. माडगूळकर यांच्या कलेचा ठेवा उलगडण्याचा प्रयत्न आनंदयात्री कार्यक्रमातून करण्याचा आम्ही केला आहे. प्रेक्षकांसाठी ही नक्कीच अनोखी पर्वणी असेल.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandyatri special program on star pravah about g d madgulkar ssv
First published on: 14-08-2019 at 15:21 IST