रेश्मा राईकवार

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

एक झंझावात जेव्हा येतो तेव्हा तो सगळे आपल्याबरोबर घेऊन जातो. तो आलाच नाही तर जे जसे आहे तसे ते घडलेच असते. त्यात वेगळेपण कदाचित अनुभवता येणार नाही. मात्र सगळे निवांत, सरळसोट सुरू राहिले असते. माणसांचेही तसेच असावे बहुधा.. एखादी व्यक्ती वादळासारखी आपल्या आयुष्यात येते. त्या वादळात काहींचे नुकसान होते, तर काहींना त्या वादळाचाच आधार वाटतो; पण सतत झंझावातात वावरलेल्या व्यक्तीचे लयाला जाणे त्याच्याहीपेक्षा त्याच्या जवळच्यांसाठी फार अवघड होऊन जाते. अशा अनेक गोष्टींचे पदर विणत काशिनाथ पर्वाची सुरेख कथा दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी आपल्यासमोर आणली आहे.

एखादीच व्यक्ती अशी असते जिच्या गोष्टीने आपण झपाटून जातो. मात्र कितीही झपाटलेपण असले तरी त्याच्या गोष्टीतून नेमके काय सांगायचे आहे, काय पोहोचवायचे आहे ही स्पष्टता लेखक-दिग्दर्शक दोघांकडे असावी लागते. इथे ही भूमिका अभिजीत देशपांडे यांनी एकटय़ानेच पेलली आहे आणि अतिशय संयत पण तितक्याच सुरेख, तरल पद्धतीने काशिनाथ पर्वाची सुरेख गोष्ट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. अभिनयाचे वेड डॉक्टरांच्या मनावर स्वार होते. त्यामुळे व्यवसायाने दातांचा डॉक्टर असलेला हा गृहस्थ नाटकात आपल्या यशाची वाट शोधत राहिला. कित्येक महिन्यांच्या, वर्षांच्या संघर्षांने हे वेड जेव्हा अभिनेता म्हणून रंगमंचावर पोहोचले तेव्हा मिळालेले यश हे त्याहीपेक्षा किती तरी पटीने भारावून टाकणारे होते. या यशाला नेमकी कुठली, कशी दिशा द्यायची हे त्यांनाही आकळले नाही. त्यांच्यात जात्याच असणारी बेदरकार, बेफिकीर वृत्ती त्यांच्यातील कलाकाराला सुखावणारी ठरली, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ती त्यांना मित्र कमी शत्रू जास्त देऊन गेली; पण इथे ही गोष्ट एकटय़ा काशिनाथ घाणेकरांची नाही. त्यांच्याबरोबरीने ती त्यांना घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वसंत कानेटकरांची आहे, मास्टर दत्ताराम यांची आहे. त्यांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रभाकर पणशीकर यांची आहे, तर घाणेकरांना टक्कर देत कलाकार म्हणून नावारूपाला येणाऱ्या डॉ. लागूंची आहे. तितकीच ती त्यांना समजून घेत संसार करू पाहणाऱ्या त्यांच्या पहिल्या पत्नीची- इरावतीचीही आहे आणि त्याचबरोबर ती घाणेकरांमुळे आलेला सुवर्णकाळ पाहणाऱ्या, त्यांच्याबरोबर बदलत गेलेल्या रंगभूमीचीही आहे. एकाच व्यक्तित्वाचे इतके भलेबुरे पदर, त्यांचे उमटत गेलेले परिणाम आणि या सगळ्यापासून अलिप्त अशा अवलिया कलाकाराचे हे ऱ्हासपर्व आपल्याला चटकाही लावून जाते आणि विचार करायलाही भाग पाडते.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे कलाकार म्हणून कसे होते, व्यक्ती म्हणून कसे होते, चांगले होते की वाईट होते, याची समीक्षा करण्याची भूमिका दिग्दर्शकाने घेतलेली नाही. मराठी रंगभूमीला स्टारडम काय असते याची अनुभूती देणारा घाणेकर हा पहिला आणि अखेरचा असा एक अप्रतिम कलाकार होता. एका वेडाने, जिद्दीने पेटलेला हा कलाकार आयुष्यभर फक्त आपल्या वडिलांच्या दोन कौतुकाच्या शब्दांसाठी आसुसलेला होता. हे दु:ख त्यांना आयुष्यभर पुरून उरले आणि त्याच दु:खावरची फुंकर त्यांनी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या  टाळ्यांमध्ये शोधली. तो ओलावा चाहत्यांच्या स्पर्शात शोधला. अवघे आयुष्य त्यांनी या चाहत्यांच्या प्रेमावर उधळून लावले. त्यांच्या अंतरीची तगमग त्यांच्या पत्नीला उमगली, तिने तिच्या पद्धतीने साथही दिली. मात्र एका वळणावर तिने हा प्रवास सोडून दिला. कलाकाराशी जोडल्या गेलेल्या त्याच्या जिवलगांची, चाहत्यांच्या टोकाच्या प्रेमाची गोष्टही इथे दिग्दर्शकाने दाखवून दिली आहे. कथेतच इतकी सारी व्यक्त-अव्यक्त नात्यांची सुरेख गुंफण असताना त्याला सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, आनंद इंगळे, प्रसाद ओक, सुहास पळशीकर, मोहन जोशी, नंदिता पाटकर आणि वैदेही परशुरामीसारख्या अनेक कलाकारांची सक्षम साथ असल्याने हा चित्रपट अभिनयाच्या दृष्टीनेही पर्वणीच आहे. यापैकी प्रत्येक कलाकाराने याआधीच स्पष्ट केले आहे की, त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या भूमिका केल्या त्यांच्यापैकी कोणाचीही नक्कल केलेली नाही आणि हे चित्रपटातून ठळकपणे जाणवते. कोणतेही दडपण न घेता सुबोध, सुमीत, सोनाली, प्रसाद ओक यांच्यासह प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख वठवली आहे. त्यामुळे रंगभूमीचा एक काळ आणि त्या काळातील कलाकारांची ही गोष्ट अधिक खरी वाटते. ते असेच वागले असतील, बोलले असतील का, असले फालतू प्रश्न मनाला शिवत नाहीत. याचे श्रेय खऱ्या अर्थाने दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांचेच आहे. त्यांच्या नजरेतून जाणवलेले घाणेकर हे अधिक अभ्यासू वृत्तीतून आलेले आहेत. काशिनाथ नावाचे एक झंझावाती सोनेरी पर्व अनुभवण्याची ही सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली आहे ती दवडणे आपल्याला परवडणारे नाही..

* दिग्दर्शक – अभिजीत देशपांडे

* कलाकार – सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, नंदिता पाटकर, मोहन जोशी, सुहास पळशीकर, आनंद इंगळे, प्रसाद ओक.