flashback, ajay devgnआज खूप चांगल्या प्रमाणात हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टारच्या हस्ते मराठी चित्रपटाचे मुहूर्त होत आहेत. पूर्वी मात्र हा योग खूप दुर्मिळ होता म्हणूनच महत्त्वाचा देखील होता. सोबतचे छायाचित्र पहा. अनिल कपूरच्या हस्ते ‘घायाळ’ (१९९३) या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात अजिंक्य देव व जॉनी लिव्हर यानी सहभाग घेतल्याचे दिसतेय. आता ‘घायाळ’चे निर्माते एन. चंद्रा यांचा हा पहिला (आणि एकमेव देखील) मराठी चित्रपट असल्याने त्याच्या मुहूर्ताला हिंदीचे ग्लॅमर हवे होतेच. उर्मिला मातोंडकर देखील हजर होती. बालकलाकार म्हणून ‘झाकोळ’, ‘संसार’ अशा मराठी चित्रपटांबरोबरच तिने ‘मासूम’ आणि ‘डकैत’ सारख्या हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका साकारल्यात. पण ‘घायाळ’च्या मुहूर्ताला ती चंद्रांच्या ‘नरसिंह’च्या यशाची तारका होती. अनिल कपूरला तर चंद्रांचा ‘तेजाब’ फळला. त्यांचाच ‘हमला’चाही तोच हिरो (धर्मेंद्रसह) त्यामुळेच तर तो येथे फिट ठरला. ‘घायाळ’चे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे याचे! त्याचा ‘हमाल! दे धमाल’ पासूनच चंद्रानी त्याला करारबद्ध केले होते. ‘घायाळ’मधे नामवंत कलाकारांची फौज. मधुकर तोंरडमल, अजिंक्य देव, कविता लाड (तिचा हा पहिलाच चित्रपट), नीना कुलकर्णी, अशोक सराफ, पद्मा चव्हाण, जॉनी लिव्हर, शिवाजी साटम इत्यादी. अनिल कपूरच्या हस्ते मुहूर्त झाल्याने ‘घायाळ’ची बराच काळ चर्चा सुरु राहिली हे वेगळे सांगायलाच नको. ‘हमाल! दे धमाल’ (१९८८) मधे अनिल कपूरने पाहुणा कलाकार म्हणून छोटीशी भूमिका साकारल्याने त्याला मराठी चित्रपटाची कार्यशैली काही प्रमाणात माहित होतीच म्हणा. त्यात हा अनुभव.