अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात सुरु असलेल्या वादात अनेक कलाकारांनी उडी घेत त्यांची मत व्यक्त केली आहेत. या कलाकारांच्या यादीत अभिनेता अनिल कपूरचाही समावेश झाला असून त्यानेदेखील त्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘आज महिला #MeToo च्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला उघडपणे वाचा फोडत आहेत. त्यामुळे आपण त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांची समस्या काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे’, असं अनिल कपूर म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘महिलांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. समाजात त्यांच एक स्थान आहे. त्यामुळे त्यांचे विचार, मत आपण ऐकली पाहिजेत तरच त्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतील. समाजात त्यांचं स्थान समानतेचं नाही तर उच्च आहे. माझ्या घरातही महिला आहेत. मी कायम त्यांच ऐकतो. त्यामुळे आज त्या माझ्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात’.

दरम्यान, आतापर्यंत #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक दिग्गज व्यक्तींवर आरोप करण्यात आले असून अभिनेता आलोक नाथ यांनी नुकताच दिग्दर्शिका विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये हे प्रकरण चांगलंच गाजल्याचं दिसून येत आहे.