अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच निधन होऊन आता ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, आजही त्याच्या आठवणींमध्ये अनेक चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. उत्तम अभिनय आणि प्रत्येकाशी आदबीने वागण्याच्या गुणामुळे सुशांत अनेकांचा लाडका अभिनेता झाला होता. त्यामुळे त्याला विसरणं चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना शक्य नाही. यामध्येच ‘पवित्र रिश्ता’च्या टीमने सुशांतला अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने ही श्रद्धांजली वाहिली ती पाहून अनेकांचे डोळे ओले झाल्याचं पाहायला मिळालं.
अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘झी रिश्ते अवॉर्ड 2020’ सोहळ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘पवित्रा रिश्ता’च्या संपूर्ण टीमने सुशांतला खास आणि अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली.
View this post on Instagram
सुशांतवर चित्रीत करण्यात आलेल्या मालिका व चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या गाण्यांवर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांनी परफॉर्मेन्स सादर केले. विशेष म्हणजे या परफॉर्मेन्सची सुरुवात ‘साथिया ये तूने क्या किया’ या गाण्यापासून झाली आणि उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा आपसूकच पाणावल्या गेल्या.
दरम्यान, सध्या अंकिताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. १४ जून रोजी सुशांतचं राहत्या घरी निधन झालं. त्याच्या निधनामुळे कलाविश्वावर आणि चाहत्यांवर एकच शोककळा पसरली असून अनेक चाहते आजही त्या धक्क्यातून सावरले नसल्याचं दिसून येतं.