गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे सातत्याने चर्चेत येत आहे. सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळावा यासाठी अंकिता अनेक वेळा सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेकांनी तिला पाठिंबादेखील दिला आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केल्यामुळे अंकिता ट्रोल झाली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिचे काही फोटो शेअर केले होते. मात्र या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिला खडे बोलदेखील सुनावले आहेत.
अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ओम प्रिंट असलेला पायजमा परिधान केला आहे. या पायजम्यावर ओम प्रिंटसोबत काही मंत्रोच्चारदेखील असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. ‘ओम हे देवाचं प्रतिक आहे त्यामुळे त्याचं वस्त्र परिधान करणं योग्य नाही’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘हा देवांचा अपमान आहे’, असं काही जणांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अंकिताने नवीन हेअर स्टाइल केल्यामुळे तिने हे फोटो शेअर केले होते. अंकिताच्या आईने अंकिताचे खास पद्धतीने वेणी घातली होती. त्यामुळे हा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. मात्र, अनेकांनी तिला ट्रोल केल्याचं दिसून आलं.