प्रसिद्ध साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या एका कथेवर आधारित असलेला ‘इभ्रत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. खरं तर हा चित्रपट २१ फ्रेब्रुवारीलाच प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटाच्या कथानकावरुन आता एक नवीनच वाद उद्भवला आहे. परिणामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.
‘इभ्रत’चे प्रदर्शन पुढे का ढकलले?
‘इभ्रत’ हा मराठी चित्रपट आण्णाभाऊ साठे यांच्या ‘आवडी’ या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथानकावरुन सतीश वाघेला यांनी निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. वाघेला यांच्या मते ‘आवडी’ या कथेचे हक्क आण्णाभाऊ यांच्या सून सावित्रीमाई साठे यांनी त्यांना दिले आहेत. तर ‘इभ्रत’च्या निर्मात्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते हे हक्क त्यांना दिले आहेत. अखेर हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालय येत्या काळात या सर्व प्रकाराची शहानिशा करुन निर्णय देईल. त्यानंतरच ‘इभ्रत’ प्रदर्शित होईल.