अभिनेते अनुपम खेर व अभिनेत्री किरण खेर यांच्या लग्नाला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ ऑगस्ट १९८५ रोजी या दोन दिग्गज कलाकारांनी लग्नगाठ बांधली. दोघंही त्यांच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखले जातात. या दोघांची लव्हस्टोरी तितकीच रंजक आहे. किरण खेर आणि अनुपम खेर यांनी प्रेमविवाह केला असून त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं. प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली. मात्र, यावेळी दोघांचंही लग्न झालं होतं. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होती. यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. स्ट्रगल काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांच्या पतीपासून गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.
घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते. त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:चं नाव दिलं.
आणखी वाचा : चाहतीच्या फॅशनसमोर फिकं पडलं दीपिकाचं सौंदर्य
लग्नाच्या ३४ व्या वाढदिवशी अनुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय किरण, आयुष्यातील खूप मोठा प्रवास एकत्र करण्याचा निर्णय आपण दोघांनी घेतला आहे. ३४ वर्षे पूर्ण झाली, तरीही असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे,’ असं लिहित त्यांनी लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे.