हिंदी चित्रपटसृष्टीचा लाडका ‘संजूबाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होते आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या भूमिकेमध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याचे पक्के झाल्यानंतर इतर संजय दत्तच्या आयुष्यातील इतर पात्रांची भूमिका कोण स्वीकारणार याची चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेत्री सोनम कपूर या चित्रपटामध्ये दिसणार हे पक्के झाल्यानंतर आता बॉलिवूडची आणखी एक आघाडीची अभिनेत्री संजय दत्त आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये रणबीरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचे समजते.

अनुष्काला या चित्रपटाचे कथानक आवडल्यामुळे तिने या चित्रपटातील लहानशी भूमिका स्वीकारल्याचे कळते. अनुष्काने या चित्रपटासाठीचे चित्रिकरण देखील सुरु केले असून ४ ते ५ दिवसांमध्ये तिच्या चित्रपटामधील भूमिकेचे चित्रण पूर्ण होणार आहे. चित्रपटामध्ये अनुष्काची भूमिका छोटी असली तरी ही भूमिका दमदार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगत आहे. या चित्रपटात नक्की ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या प्रेमिकेच्या रुपात अनुष्काला दाखविण्यात येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अनुष्का शर्मापूर्वी सोनम कपूर या चित्रपटात संजूबाबाच्या  प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते. धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यातील प्रेमप्रकरणाला उजाळा देण्यासाठी सोनम कपूरची या चित्रपटात वर्णी लागल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत.


संजू बाबाच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये परेश रावल संजय दत्तचे  स्वर्गीय पिता सुनील दत्त यांची भूमिकेत झळकणार आहेत. राजकुमार हीरानी यांनी यापूर्वी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटामध्ये संजय दत्तसोबत काम केले आहे. दोन चित्रपटात काम केल्यानंतर हिराणी यांनी संजय दत्तचे आयुष्य चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा ध्यास घेतला. या चित्रपटानंतर संजय दत्तसोबत हिरानी मुन्नाभाईच्या मालिकेतील ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार असल्याचे देखील समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. संजयला जेव्हा त्याच्या जीवनपटाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला आनंद आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. पण रणबीरबाबत विचारल्यानंतर संजय फारसा खुश दिसला नव्हता. रणबीरसाठी ही व्यक्तिरेखा साकारणं थोडं कठीण असल्याचे संजय दत्तने म्हटले होते. रणबीरला माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.असेही संजय दत्तने यावेळी सांगितले होते.