अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. नेहमीच आपल्या अभिनयातून विविध भूमिकांना न्याय देणारी अनुष्का एका आव्हानात्मक आणि तितक्याच भितीदायक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काच्या आगामी ‘परी’ या चित्रपटाचे टिझर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असून त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून अनुष्का आणखीनच भितीदायक रुपात समोर येत असून, पुन्हा एकदा तिचं रुप मनात प्रश्नांचा काहूर माजवत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला एका दरवाजातून कॅमेरा थेट घराच्या बाल्कनीपाशी जातो. जेथे बाल्कनीच्या रेलिंगवर पाठमोरी बसलेली अनुष्का दिसते. या दृश्यात पार्श्वभूमीत वाजणारं म्युझिक आणि त्यात थरकाप उडवणाऱ्या अनुष्काची नजर पाहून ही परी आणखी किती घाबरवणार हाच प्रश्न उपस्थित होतो.

वाचा : शिवजयंती : प्रत्येकाने आदर्श घ्यावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची खास गुणवैशिष्ट्ये

प्रसित रॉय दिग्दर्शित ‘परी’ या चित्रपटातून भयपटाला वेगळ्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता आणि मुंबईत परीचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. तेव्हा या दोन शहरांमध्येच हा भयपट उलगडत जातो की आणखी कोणतं वळण घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान, ‘फिल्लौरी’ आणि ‘एनएच १०’ या चित्रपटांनंतर अनुष्का पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीत सक्रीय झाली आहे. २ मार्च २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर ‘परी’चा प्रभाव पाहायला मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.