दृष्टी नसली तरी जग संपत नाही, पण समस्यांमध्ये मात्र भर पडते. अंध विद्यार्थ्यांना १० वी-१२ वीपर्यंत जास्त समस्या येत नसल्या तरी त्यानंतर मात्र त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत जाते. जिथे १२वीनंतर अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची वानवा असते तिथे करिअर घडवण्याचा काय विचार करणार? पण जे हरण्याचा विचार करत नाहीत तेच जिंकतात, असाच जिंकण्याचा निर्धार त्यांनीही केलाच. आम्ही अंध असलो तरी आम्हाला सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. आम्हाला संधी द्या आणि बघा, असं म्हणत ते १९ अंध विद्यार्थी एकत्र आले. धडधाकट व्यक्तींसाठीही जे आव्हान असतं ते पेलायचं त्यांनी ठरवलं आणि रंगभूमीवर आलं ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळपास २५ वर्षांपासून स्वागत थोरात हे अंध व्यक्तींसाठी काम करतात. फक्त प्रशिक्षणच नाही तर त्यांना घेऊन नाटकही बसवतात. या मुलांनी थोरात सरांना आपली मनीषा सांगितली. थोरात सरही चांगल्या संहितेच्या शोधात होते, गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी एकही नाटक केलं नव्हतं. गणेश डिगे हे लेखक सात वर्षांपासून मेघदूत करत होते. त्यांच्याकडे चांगली संहिता होती. त्यांनी ‘अपूर्व मेघदूत’ची संहिता थोरात सरांना ऐकवली आणि त्यांना ती आवडली. आता आव्हान होते ते नाटक बसवण्याचे. नाटक बसवणं हे आव्हानच, पण ते अंध मुलांना घेऊन बसवणं कर्मकठीण समजलं जातं. या नाटकाची ८० दिवस तालीम त्यांनी घेतली. त्यानंतर आठ रंगीत तालमी झाल्या आणि नाटक रंगभूमीवर आलं. पहिल्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर दोन महिने हे नाटक कोणतीही संस्था घेण्यासाठी उत्सुक नव्हतं. नाटक बंद केलं तर या मुलांच्या प्रयत्नांवर विरजण पडेल, असं निर्मात्या रश्मी मांढरे आणि वीणा ढोले यांना वाटलं आणि त्यांनी स्वखर्चाने नाटक करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तेवढासा सोपा नव्हता. कारण नाटकात १९ पात्रं, त्याचबरोबर मेघदूतसारखी संहिता असेल तर वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य हे सारे त्या काळातले असायला हवे. त्यामुळे नाटकाचा खर्च वाढला आणि एका प्रयोगाला साधारण एक लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पण निर्मात्यांनी प्रयोग करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी तीन प्रयोग केले, या तिन्ही प्रयोगांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण ज्या मोजक्या लोकांनी हे तीन प्रयोग पाहिले होते त्यांनी ते अन्य लोकांना बघायला सांगितले आणि गर्दी वाढत गेली. पंढरपुरात झालेल्या प्रयोगाला तब्बल ९०० लोकांनी उपस्थिती लावली. नाइलाजास्तव बऱ्याच लोकांना तिकिटं देता आली नाहीत. सध्याच्या घडीला या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकातून नफा मिळवण्याचा उद्देश नाही. कारण या नाटकाचा नफा अन्य सामाजिक कामांसाठीही वापरला जातो. आणि याचा आनंद या अंध विद्यार्थ्यांना सर्वाधिक आहे. आपल्याला लोक मदत करतात, पण आपण कुण्याच्या तरी उपयोगी पडू शकतो, ही भावना त्यांना स्वर्गीय आनंद देऊन जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apoorva meghdoot drama with cast of 19 visually challenged artists
First published on: 23-04-2017 at 02:38 IST