ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांचा मुलगा आणि सुपरस्टार सलमान खानचा भाऊ असूनही या दोघांच्या स्टारडमचा तोटा नाही तर फायदाच झाल्याचं अभिनेता अरबाज खान म्हणतो. सलमानचा भाऊ म्हणून ओळखला जात असल्याचा कोणताच त्रास होत नसल्याचं तो सांगतो.
‘पीटीआई’शी साधलेल्या संवादात अरबाजने त्याच्या करिअरविषयी बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. ‘सलमानचा मी भाऊ असल्याने माझा नेहमी फायदाच झाला आहे. माझ्या वडिलांच्या आणि भावाचा स्टारडममुळे माझ्या करिअरवर परिणाम नाही झाला. अभिनय क्षेत्रात जरी मी विशेष कामगिरी करु शकलो नसलो तरी त्याचा दोष मी त्यांना देऊ शकत नाही,’ असं तो म्हणाला.
वाचा : मातृत्वाच्या मुद्दयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ऐश्वर्या ‘सरोगेट मदर’ची भूमिका साकारणार?
एखाद्या प्रतिष्ठित आणि नामवंत कुटुंबातून पुढे आल्यास साहजिकच अशा कलाकाराकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. आजकाल हे अनेक स्टारकीड्सच्या बाबतीत होताना पाहायला मिळते. अशा वेळी कुटुंबाचा मला काय फायदा झाला हाच विचार करत असल्याचं अरबाजने पुढे स्पष्ट केलं. अभिनयाचं वेड अजूनही असून पैसे कमावण्यासाठी मी ते करत नाही. त्यासाठी मग मी वेगळा व्यवसाय किंवा वेगळे क्षेत्र निवडले असते, असेही तो म्हणाला.
वाचा : लैंगिक शोषण करणाऱ्यांची वेळ संपली आहे- ओपरा वीन्फ्रे
अभिनयानंतर अरबाजने २००९ मध्ये निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. सलमानच्या ‘दबंग’ या चित्रपटाची निर्मिती आणि ‘दबंग २’च्या निर्मितीसोबतच दिग्दर्शनही त्याने केलं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरले होते.