बॉलीवूडमध्ये सध्या खेळाडूंवर चित्रपट बनविण्याचा ट्रेण्ड चालू आहे. ‘इश्कजादे’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अर्जुन कपूर त्याच्या आगामी चित्रपटात कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे वडिल आणि निर्माता बॉ़नी कपूर यांच्या ‘तेवर’ या चित्रपटात तो ही भूमिका साकारणार दिसेल.
बॉनी कपूर यांना चित्रपटाला ‘तेवर’ हे शीर्षक देण्याची इच्छा होती. यश चोप्रा यांचे हे आवडते शीर्षक असल्यामुळे अर्जुन कपूरने आदित्य चोप्राला त्याबाबत विचारणा केली. त्यावर आदित्यने अजीबात वेळ न दवडता चित्रपटास ‘तेवर’ नाव देण्यास होकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटात कबड्डी चॅम्पियन असलेल्या आग-यातील एका कॉलेजकुमाराची भूमिका अर्जुन साकारणार आहे.
तेलगु चित्रपट ‘ओक्काडू’चा रिमेक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा करणार असून अर्जुनच्या प्रेयसीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा दिसेल. या चित्रपटाव्यतिरीक्त ‘गुंडे’, ‘२स्टेट्स’ आणि ‘फाइंडिंग फॅनी फर्नांनडिस’ हे चित्रपट अर्जुनच्या खिशात आहेत.